नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील सीतापूरच्या तुरुंगात गेल्या २६ महिन्यांपासून बंद असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. खान यांच्या जामिनासाठीच्या अटी-शर्थी कनिष्ठ न्यायालयाने निश्चित कराव्यात, असे सांगतानाच सामान्य जामिनासाठी खान यांनी संबंधित न्यायालयात पुढील दोन आठवड्यात अर्ज दाखल करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
नियमित जामीन मिळेपर्यंत खान यांच्यासाठी अंतरिम आदेश लागू असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 80 पेक्षा जास्त प्रकरणात अडकलेले आझम खान २६ महिन्यांपासून सीतापूरच्या तुरुंगात बंद आहेत. एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर लगेच त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल होत असे. यानंतर खान यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने घटनेतील कलम १४२ चा अवलंब करीत आझम खान यांना जामीन दिला आहे, हे विशेष. दुर्मिळ प्रकरणात या कलमाचा वापर केला जातो.
कनिष्ठ न्यायालयाकडून ८८ प्रकरणात आझम खान यांना जामीन मिळालेला आहे. ८९ व्या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुनावणी सुरु होण्यापूर्वीच न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने त्यांचा जामीनअर्ज मंजूर केला आहे. आझम खान यांच्यावर प्रामुख्याने सरकारी, खाजगी जमिनी बळकावणे, फसवणूक करण्याचे गुन्हे दाखल आहेत.