नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही काळापासून पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी अखेर आज (गुरूवार) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत राजधानीतील भाजप मुख्यालयात त्यांनी भाजपची सदस्यता ग्रहण केली. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यापासून जाखड दिल्लीत आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवाय राज्यातील पक्षविस्ताराची जबाबदारी त्यांना दिली जावू शकते.
जाखड (Sunil Jakhar) अनुभवी नेते असून राजकीय जीवनात त्यांनी आपले एक नाव बनवले आहे. पंजाबमध्ये पक्षाला बळकट करण्यात ते महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी नड्डा यांनी व्यक्त केला. गेल्या ५० वर्षांपासून तीन पिढ्या काँग्रेसची सेवा केली. पंरतु, पंजाबमध्ये राष्ट्रवाद, एकता आणि बंधुभावाच्या मुद्दयावर काँग्रेससोबत असलेले हे नाते तोडत आहे, अशी भावना जाखड यांनी व्यक्त केली.
देशभरात काँग्रेस पक्षाला लागलेली घरघर थांबवण्यासाठी नुकतेच राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रमुख नेत्यांसोबत चिंतन शिबिरातून चर्चा केली. हे शिबिर आटोपताच गेल्या दोन दिवसांमध्ये गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि आता पंजाबमधील नेते जाखड यांनी पक्षाला रामराम ठोकला. पंजाबमधील हातची सत्ता गमावल्याने राज्यातही पक्षाची वाताहात सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गुजरातमध्ये ऐन निवडणुकीच्या तोडांवर पटेलसारखा पाटीदार नेता गमावल्याने पक्षश्रेष्ठींना पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यशैलीसह इतर संघटनात्मक मुद्दयांवर चिंतनाची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचलंत का ?