चंद्रपूर : भूमिअभिलेख कार्यालयातील दोघांना लाच घेताना पकडले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक व छाननी कर्मचारी यांना पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी ( दि. १७ मे ) दुपारी भद्रावती येथे भूमि अभिलेख कार्यालयात करण्यात आली आहे. संजय भिमराव चांभारे व प्रशांत लिलाधर सोनकुसरे असे संशयित आरोपींची नावे आहेत. या कारवाईने भद्रावती भूमि अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चंद्रपूर येथील असून, त्यांची भद्रावती तालुक्यातील चेक तिरवंजा येथे गट नंबर 76 मध्ये 1.16 हेक्टर शेतजमिनी आहे. त्यांना या शेतीची मोजणी करावयाची होती. त्यामुळे त्यांनी भद्रावती येथील भूमि अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधला होता; परंतु, भूमि अभिलेख कार्यालयातील दोघांनी त्यांच्याकडे ५ हजार लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदारने चंद्रपूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालयात भूमि अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक संजय चांभारे व छाणनी लिपीक प्रशांत सोनकुसरे यांच्याविरोधात लाच मागण्याबाबत तक्रार नोंदविली.
या तक्रारीच्या अनुषंगाने सदर प्रकरणाबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी भूमिअभिलेख कार्यालय भद्रावती येथे आरोपींविरोधात सापळा रचला. याच दरम्यान पंचासमक्ष मुख्यालय सहाय्यक संजय भिमराव चांभारे व छाणनी लिपीक प्रशांत लिलाधर सोनकुसरे यांना तक्रारदाराकडून ५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांनतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोलिस अधीक्षक मधूरक गिते, पोलिस उपअधिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलिस हवालदार अरूण हटवार, नाईक पोलिस कॉन्सटेबल रोशन चांदेकर. संदेश वाघमारे, म. पोलिस कॉन्स्टेबल पुष्पा काचोळे, सिमा आंबेकर यांनी पार पाडली.
हेही वाचलंत का?
- बूस्टर डोसच्या तुलनेत ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती अधिक, अभ्यासातून खुलासा
- कोल्हापूर : दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा
- सातारा : जिल्ह्यात 9 गावे व 22 वाड्यांना टँकरने पाणी