सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात तीव्र उन्हाळा सुरु झाला असल्याने पाणी स्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून माण, वाई, सातारा, कराड या तालुक्यातील 9 गावे व 22 वाड्यांमधील 10 हजार 718 नागरिक व 1 हजार 869 जनावरांना 5 टँकरने पाणी पुरवठा प्रशासनामार्फत केला जात आहे.
मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. मात्र जलसंधारणाची कामे प्रशासनामार्फत माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा यासह अन्य तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे जमिनीमधील भूजल पातळीही स्थिर आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात एकही टँकर सुरु नव्हत.
मात्र दुसर्या आठवड्यापासून विविध गावातून पिण्यासाठी टँकरची मागणी झाली. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत त्या गावांचा सर्व्हे करुन संबंधित गावांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत टँकर सुरु करण्यात आले आहेत. माण तालुक्यातील पाचवड गावठाण शिंगाडेवस्ती, गेंदवाडा, पांगरी गावठाण, स्टँड परिसर, मुलाणी वस्ती, खरातवस्ती, पंदरकी, लांडगोबा, मोरदरा, लक्ष्मीनगर, तपासेवस्ती, जाधववस्ती, वाघाडी, लोखंडेवस्ती, चाफेमळा, धुळाची मळवी, गडदेवस्ती, बिजवडी गावठाण, वारूगड, मठवस्ती, खंड्याचीवाडी, गावदरा, उगळेवाडे असे मिळून 4 गावे व 19 वाडी-वस्त्यांमधील 4 हजार 981 नागरिकांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
वाई तालुक्यातील मांढरदेव व गडगेवाडी येथील 2 हजार 205 नागरिक व 553 जनावरांसाठी 2 टँकर मंजूर करण्यात आले आहेत. सातारा तालुक्यातील जांभगाव, आवाडवाडी, निकमवाडी येथील 1 हजार 354 नागरिक व 340 जनावरांना 2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कराड तालुक्यातील वानरवाडी, बामणवाडी येथील 2 हजार 178 नागरिक व 976 जनावरांना एका टँकदद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.