नाशिक शहरात सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून 16 ठिकाणी 'नो ड्रोन फ्लाय झोन’ | पुढारी

नाशिक शहरात सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून 16 ठिकाणी 'नो ड्रोन फ्लाय झोन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देश-विदेशात दहशतवादी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ड्रोनचा वापर करून नुकसान पोहोचवले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून खबरदारी म्हणून शहर पोलिसांनी शहरातील 16 ठिकाणी नो ड्रोन फ्लाय झोन घोषित केले आहेत. त्यानुसार या 16 ठिकाणी ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलुन्स, मायक्रोलाइट, एअरक्राफ्ट आदी साधने पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता वापरता येणार नाही.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी काढलेल्या मनाई आदेशानुसार शहरातील महत्त्वाची मर्मस्थळे, संवेदनशील ठिकाणे, लष्करी आस्थापने, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नो ड्रोन फ्लाय झोन घोषित केले आहेत. या 16 ठिकाणी विनापरवानगी ड्रोन किंवा इतर हवाई साधने वापरल्यास किंवा उडवल्यास संबंधितांवर भारतीय दंडविधान कलम, इंडियन एअरक्राफ्ट कायदा व इतर कायद्यांनुसार कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधित केलेल्या ठिकाणांच्या दोन किमी परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन (मानवरहित साधन), पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलून्स, मायकोलाइट एअरक्राफ्ट आदी हवाई साधनांचा वापर करण्यासाठी पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

या ठिकाणी ड्रोनचालक व मालक यांनी त्यांना ड्रोनद्वारे कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण करायचे असल्यास कार्यक्रमाच्या ठिकाणाची माहिती अर्जात सादर करून, त्यात दिनांक व वेळ, ड्रोनची सविस्तर माहिती व ड्रोन ऑपरेटरचे नाव पत्ता व संपर्क मोबाइल क्रमांक, ड्रोन ऑपरेटरने ड्रोन प्रशिक्षण घेतल्याच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत अर्जासोबत देणे बंधनकारक आहे. त्यानंतर परवानगी मिळाल्यानंतर या 16 ठिकाणी ड्रोनचा वापर करता येणार आहे.

ही 16 ठिकाणे झाली नो ड्रोन फ्लाय झोन
देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरी, नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस, जेलरोड येथील करन्सी नोटप्रेस, एकलहरा थर्मल पॉवर स्टेशन, गांधीनगर येथील शासकीय मुद्रणालय, पंचवटीतील श्री काळाराम मंदिर, बोरगड, म्हसरूळ व देवळाली कॅम्प (साऊथ), देवळाली कॅम्प येथील एअरफोर्स स्टेशन, गांधीनगर येथील कॉम्बैट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल, जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृह व सीबीएसजवळील किशोर सुधारालय, र्त्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी व गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, एमपीए परिसर, गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्र, पोलिस मुख्यालय व पोलिस आयुक्तालय कार्यालय, सीबीएसजवळील जिल्हा न्यायालय, त्र्यंबक रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकांसह सातपूर येथील शिवाजीनगर, विल्होळी, अंबड येथील मनपाचे जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी नो ड्रोन फ्लाय झोन घोषित केला आहे.

हेही वाचा :

Back to top button