

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : कुटुंबापासून दुरावा निर्माण झाल्याने दोन दिवस घरडा सर्कलजवळ रडत बसलेल्या वृद्ध महिलेला तिच्या मुलाकडे सुपूर्द करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं.पोलीस ठाण्यात आई आणि मुलाची गळाभेट पोलिसांनी घडवून आणल्याने सर्वांचेच डोळे पाणावले.
घरडा सर्कलजवळ असलेल्या मामलेदार मिसळ या दुकानातील कर्मचाऱ्यांनी मानपाडा पाेलीस ठाण्यात १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता फोन केला. एक महिला गेले दोन दिवस दुकानाजवळ बसून रडत आहे. विचारपूस केल्यावर काहीही सांगण्यास तयार नाही, अशी माहिती दिली. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी त्वरित पाऊले उचलत सह कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जाण्याचे आदेश दिले. त्या महिलेला मनपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्या महिलेला विचारले असता रत्नागिरी मुर्डव येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
हा एक धागा पकडून पोलिसांनी यंत्रणा फिरवली. तिच्या मुलाचा क्रमांक शोधून त्याला फोन केला. यावेळी मुलगा आईला तळोजा भागात शोधत असल्याचे समजताच त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर मनपाडा पोलीस ठाण्यात आई आणि मुलाची गळा भेट पोलिसांनी घडवून आणल्याने सर्वांचेच डोळे पाणावले. दरम्यान, या आजीबईंची मुलगी कळंबोली येथे राहते. कोकणातून मुलीकडे यायला निघालेल्या आजीने एसटी वाहकाला कळंबोलीला उतरायचे आहे, असे सांगितले. वाहकाने मात्र, डोंबिवली असे ऐकल्याने आजीबाईना डोंबिवली येथे उतरवल्याने हा गोंधळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?