दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला दणका; जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार | पुढारी

दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला दणका; जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा पुतण्या मोहम्मद रिझवान इकबाल कासकर याला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याचा गंभीर आरोप मोहम्मद कासकर याच्याविरोधात आहे. २०१९ सालच्या संबंधित धमकीप्रकरणी पोलिसांनी कासकरला महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण (मोक्‍का) कायद्याअंतर्गत अटक केली होती.कासकर याच्याविरोधात लवकरात लवकर आरोपांची निश्‍चिती केली जावी, असे निर्देशही न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी दिले. जामिनासाठी कासकर नव्याने अर्ज करु शकतो, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २०२१ साली कासकर याला जामीन देण्यास विरोध केला होता. त्यानंतर कासकर याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्याच्या परिस्थितीत कासकर याला जामीन देण्याचे काही कारण दिसून येत नाही. तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र दाखल झालेले आहे. अशा स्थितीत पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत संबंधित न्यायालयाने कासकर याच्याविरोधात आरोप निश्‍चिती करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कासकर याला जुलै २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती तर १० ऑक्टोबर २०१९ रोजी पोलिसांनी मोक्‍का कायद्याअंतर्गत त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. तक्रारदार बांधकाम व्यवसायिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात देखील करतो. या व्यापारातल्या भागीदाराकडून त्याचे १५ लाख रुपयांचे येणे होते. मात्र हे येणे मागू नये, याकरिता त्याला छोटा शकीलकडून दुबईहून फोन आला होता. या प्रकरणात कासकर व अन्य लोकांचा सहभाग दिसून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

व्हिडीओ पाहा : न्यायालयाची भाषा | अग्रलेख | पुढारी

हेही वाचलत का ?

Back to top button