औरंगाबाद-जळगाव महामार्गावर बर्निंग कारचा थरार | पुढारी

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर बर्निंग कारचा थरार

अजिंठा : पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव- लिहाखेडी रोडवरील साई ढाब्याजवळ आलिशान कारला अचानक आग लागल्याची घटना आज (बुधवार) सकाळी ११ च्या सुमारास घडली. कार चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीने रौद्र रूप धारण केल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. भरदिवसा महामार्गावर ही घटना घडल्यामुळे काही काळ गोधळांचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील पानवडोद बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान यांची कार घेऊन चालक आपल्या मित्रासोबत औरंगाबाद- जळगाव महामार्गावरून सिल्लोडकडे जात होते. यावेळी गोळेगाव येथील साई ढाबानजीक असलेल्या वळण रस्त्यालगत कारला ( एमएच २० एफ वाय ५०९९) अचानक आग लागली.

कारला आग लागल्याचे चालक अमीन पठाण याच्या लक्षात येताच त्याने तत्काळ गाडी थांबवली. आणि ते सर्वजण खाली उतरले. काही क्षणात आग भडकली. परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली. या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button