शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन | पुढारी

शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे निधन

बुलडाणा; पुढारी ऑनलाईन : श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर सुकदेव पाटील (वय 82) यांचे आज (दि. 04)  वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले. ते भाऊ या आदरार्थी नावाने सुपरिचित होते.

गजानन महाराज संस्थानच्या शिस्तबद्ध व पारदर्शी कारभारात व विविध उपक्रमात भाऊंचे मोठे योगदान आहे. शिवशंकर भाऊंची प्रकृती गेल्या चार दिवसापासून अस्थिर व चिंताजनक होती. त्यांचे इच्छेनुसार घरीच उपचार सुरू होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याच्या वार्तेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
12जानेवारी 1940 रोजी भाऊंचा जन्म झाला होता. त्यांचे घराजवळील शेतात सायंकाळी मोजक्याच उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती भाऊंचे  पुत्र निळकंठ पाटील व श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.

एक व्रतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोगी आपण गमावला :  देवेंद्र फडणवीस

श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते अशा शोकसंवेदना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
ते म्हणाले, शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते.
महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
हे ही वाचलं का?

 

Back to top button