चंद्रपूर : बिबट्याच्या हल्‍ल्यात चिमुकल्‍याचा बळी; दुर्गापुरातील नागरिकांचा वेकोली उपक्षेत्रीय कार्यालयास घेराव | पुढारी

चंद्रपूर : बिबट्याच्या हल्‍ल्यात चिमुकल्‍याचा बळी; दुर्गापुरातील नागरिकांचा वेकोली उपक्षेत्रीय कार्यालयास घेराव

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा अंत्यसंस्कारासाठी दुर्गापुरात आजोबांच्या घरी  आलेल्या आठ वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने (बुधवार) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फरफटत उचलून नेत ठार केले होते. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. आज (गुरुवार) दुर्गापूर येथील स्थानिक नागरिकांनी वेकोली उपक्षेत्रीय कार्यालयास घेराव घातला.

प्रतीकच्‍या आईचे वडील तेजराम मेश्राम (महाराज) यांचे निधन झाले. बुधवारी प्रतीक शेषराव बावणे (वय 8) हा आपल्या दुर्गापूर येथे आला होता. रात्री नऊच्या सुमारास सगळे कुटूंबीय घराच्या समोर बसून होते. तर प्रतीक घराच्या मागे खेळत होता. या वेळी बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला करून फरफटत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. काही प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरडा केला. काही अंतरावर काही अंतरावर त्याचा  मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. बिबट्याने चिमुकल्याचा शिर धडावेगळा केले हाेते.

याच परिसरातून फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या वेळेला घराशेजारी मोबाईल पहात बसलेल्‍या एका मुलाला बिबट्याने उचलून नेले होते. तर औष्णिक विद्युत केंद्रातून घरी परतणाऱ्या एका कामगाराला वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर या परिसरात वास्तव्यास असलेल्या वाघांपैकी फक्त एका वाघाला वनविभागाने जेरबंद केले होते. त्यानंतर पुन्हा त्याच पध्दतीने बिबट्याने गावात येऊन भक्ष्य शोधण्याची मोहीम सूरू केल्याने नागरिकांमध्‍ये दहशत पसरली आहे. या घटनेनंतर आज स्थानिक नागरिकांमध्ये बिबट्याच्या बंदोबस्तासाठी प्रचंड आक्रोश पहायला मिळाला.

वाघासह बिबट्याचा बंदोबस्त करावा

मागील महिनाभरापासून या परिसरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. याकरिता वेकोलिच्या खाणी कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वेकोली प्रशासनाने या भागांमधील झाडे-झुडपे अद्यापही काढलेली नाहीत. त्यामुळे हिंस्त्र पशु येथे वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये वेकोली प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण होवून काँग्रेसचे प्रशांत भारती यांच्या नेतृत्वात दुर्गापूर येथील स्थानिक नागरिकांनी वेकोलीच्या उप क्षेत्रीय कार्यालयास घेराव घातला.वाघ व बिबट्याचा बंदोबस्त करण्यासोबतच या परिसरात वाढलेली झाडेझूडपे साफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वरिष्ठांनी नागरिकांच्या मागण्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.

हेही वाचा :

 

Back to top button