चंद्रपूर : आजोबांच्या अंत्यसंस्काराला आलेला चिमुकला बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात ठार | पुढारी

चंद्रपूर : आजोबांच्या अंत्यसंस्काराला आलेला चिमुकला बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात ठार

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : आजोबाच्या अंत्यसंस्काराला आलेला घराशेजारी खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने फरफटत उचलून नेले. छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्‍याचा मृतदेह आढळून आला. ही खळबळजनक घटना बुधवारी (दि.30 ) रात्री चंद्रपूर
शहराजवळील दुर्गापूरमधील समता नगर परिसरात घडली. प्रतीक शेषराव बावणे (वय ८) असे बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात ठार झालेल्‍या ‍ चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने दुर्गापूर परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

घटनेची हकीकत अशी की, प्रतीक हा भद्रावती तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी आहे. त्‍याच्‍या आईचे वडील तेजराम मेश्राम (महाराज) यांचे निधन झाले. प्रीतक हा आपल्‍या कुटुंबासमवेत दुर्गापूर येथे आला होता. मेश्राम यांचे पार्थिव घरीच असल्याने सर्वजण रात्री नऊच्या सुमारास घरासमोर बसून होते. प्रतीक घराच्या मागे खेळत होता. भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याची नजर चिमुकल्यावर पडली. बिबट्याने हल्ला करून त्‍याला फरफटत जंगलात दिशेने नेले. एका प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरडा केल्‍याने हा प्रकार निदर्शनास आला.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्‍यात आली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्‍यांनी घरापासून काही अंतरावर शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी छिन्नविच्छिन्न अवस्थेत प्रतीकचा मृतदेह आढळून आला.

दुर्गापूर परिसरातील नागरिकांमध्‍ये दहशत

फेब्रुवारी महिन्यात घराशेजारी मोबाईल बघणाऱ्या एका मुलाला बिबट्याने उचलून नेले होते. या परिसरातून घरी परतणाऱ्या एका कामगारावर वाघाने हल्ला करून जंगलात फरफटत नेऊन ठार केले होते. या परिसरात वास्तव्यास असलेल्या वाघांपैकी एका वाघाला वनविभागाने जेरबंद केले होते. त्यानंतर पुन्हा त्याच पध्दतीने बिबट्याने गावात येऊन भक्ष्यशोधण्याची मोहीम सूरू केल्याने नागरिकांमध्‍ये दहशत पसरली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button