शाहुवाडी : राहत्या घरास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; चार शेळ्या जळून खाक; गायी, बैलांसह एकजण गंभीर जखमी | पुढारी

शाहुवाडी : राहत्या घरास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; चार शेळ्या जळून खाक; गायी, बैलांसह एकजण गंभीर जखमी

शित्तूर-वारूण : सतीश नांगरे 

शित्तूर-वारूणपैकी कदमवाडी (ता. शाहुवाडी) येथील मारुती नामदेव कदम, आनंदा नामदेव कदम, शंकर नामदेव कदम, राजाराम नामदेव कदम, पारुबाई नामदेव कदम, रामचंद्र कुशाबा कदम, भरत रामचंद्र कदम यांच्या राहत्या घरास बुधवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास तेरा खनाच्या राहत्या घरास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरासह चार शेळ्या, एक मोटार सायकल, धन-धान्य व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. आगीतून जनावरांना वाचविताना नामदेव कुशाबा कदम (वय-६५) हे भाजून गंभीररित्या जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. या आगीत सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. पण आग आटोक्यात आली नाही.

भीषण आग
भीषण आग

चार शेळ्या जळून खाक; गायी व बैलांसह एकजण गंभीर जखमी

बुधवारी रात्री पावणे तीनच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे कदम कुटूंबाच्या राहत्या घरास आग लागली. आग रात्रीच्या वेळेस लागली होती. घरातील सगळेजण गाढ झोपेत होते. घराला आग लागली असल्याचे मारुती नामदेव कदम यांच्या निदर्शनास आले. घरातील लोकांनी आरडाओरडा केला. जवळच्या लोकांशी संपर्क साधला. रात्रीची वेळ असल्याने लोक जमा होण्यास वेळ लागला. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. तरुणांनी आडव्या फाट्याच्ये पाणी अडवून भांड्यांच्या व मोटारीच्या साहाय्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्यासाठी जिवाचे रान केले. आगीत चार शेळ्या जळून खाक झाल्या. गायी व बैल भाजून जखमी झाले. याशिवाय साठ पोती धान्य, टीव्ही, मोबाईल संच, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोटारसायकल, शेती अवजारे, कपाटे, कागदपत्रे व सर्व प्रापंचिक साहित्य, घराच्या छताचे सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे तीस लाख रूपयांचे नुकसान झाले. पहाटे सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. या आगीमुळे ऐन उन्हाळ्यात कदम कुटुंबियांना बेघर होण्याची वेळ आली आहे.

 विद्युत वितरणच्या गलथान कारभार

 विद्युत वितरणच्या गलथान कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे घटनास्थळी ग्रामस्थांमधून बोलले जात होते. या वाडीमध्ये उभे असलेले विजेचे खांब हे तळापासून काही अंतरापर्यंत पूर्णतः सडले आहेत. उभ्या असलेल्या या खांबांना लाकडाचा व दगडांचा ठेपा देण्यात आला आहे. दुर्घटना घडण्याआधी हे खांब बदलावेत. अशी वारंवार मागणी करूनही विद्युत वितरणने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

तहसिलदार गुरू बिराजदार, मंडल अधिकारी मोहन जाधव, गावकामगार तलाठी ए. ए. खटावकर, कोतवाल दिनकर यटम, पोलिसपाटील दीपक भोसले, सरपंच नीता पाटील, उपसरपंच लक्ष्मण पाटील, विद्युत वितरणचे पवन माने, महेंद्र चोपडे, भगवान पाटील, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

पवन माने (शाखा अभियंता)

                        शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाईल.

गुरू बिराजदार (तहसिलदार-शाहुवाडी)

                       जळीतग्रस्त कुटुंबाला शासनाकडून मदत केली जाईल. मात्र समाज म्हणून आपण त्यांच्या पाठीशी खामबीरपणे उभे राहिले पाहिजे.

Back to top button