भंडारा : राजनीत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

भंडारा : राजनीत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

भंडारा, पुढारी ऑनलाईन : बँक, पतसंस्था आणि खाजगी कर्जाला कंटाळून एका ५७ वर्षीय शेतकऱ्याने  राहत्या घरी विषप्राशन केल्याची घटना घडली होती. मात्र घरातील अन्य सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि पुढे नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तब्बल आठवडाभरानंतर उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

मधुकर महादेव ठाकरे (५७) रा राजनी असे मृतकाचे नाव आहे. सबंधित मृतक तालुक्यातील राजनी येथील रहिवासी आहे. त्यावर बँक, पतसंस्था व खाजगी असे एकूण मिळून जवळपास ६ लाखांचे कर्ज आहे.

या कर्जाला कंटाळून मृतकाने गत १८ जुलै रोजी राहत्या घरी विषप्राशन केले होते. संबंधिताच्या विषप्राशनाची घटना घरातील अन्य सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधिताला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

रुग्णाची स्थिती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ या रुग्णाची स्थिती अधिकच गंभीर होत असल्याने त्याला पुढील उपचारार्थ नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र तिथे देखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर आठवडाभरानंतर त्याची मृत्यूशी असलेली झुंज संपली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकाच्या मागे पत्नी आणि २५ वर्षीय अविवाहित एक मुलगा आहे. मृतकाचे कर्ज माफ करून त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Back to top button