भंडारा, पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमन्स्यातून एका युवकाचा तलवारीने वार करुन खून करण्यात आला. यानंतर त्याचा मृतदेह नदीत फेकण्यात आला. तब्बल आठ दिवसानंतर मृतदेह नदीपात्रात आढळून आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र उर्फ टिंकू संतोष दहिवले (36) रा. सुभाष वॉर्ड, बेला असे मृताचे नाव आहे. तर शुभम उर्फ आर्यन नंदकिशोर मंदूरकर (21) रा. कृष्ण मंदिर वॉर्ड, निशान उर्फ अम्मू अनिल कटकवार (19) रा. चांदणी चौक , दिपांशू उर्फ बिट्टू सुभाष शहारे (20) रा. आंबेडकर वॉर्ड, हेमंत उर्फ भांजा रा. टप्पा वॉर्ड भंडारा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
महेंद्र आणि आरोपी शुभम मंदूरकर यांच्यात ९ मार्च रोजी भांडण झाले. यातूनच १० मार्च रोजी रात्री सर्व आरोपी दुचाकी क्र. एमएच 36 एजे 3999 ने महेंद्रच्या घरी गेले. फिरायला जाऊ, असे सांगत त्याला बाहेर घेऊन गेले. रात्री उशिरा त्यांनी महेंद्रला वैनगंगा नदीच्या जुन्या पुलावर आणले. त्याठिकाणी त्याला मारहाण केली. तलवारीने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह वैनगंगा नदीत फेकून दिला. दरम्यान, १४ मार्च रोजी भंडारा पोलिस ठाण्यात महेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार नाेंदवण्यात आली. १७ मार्च रोजी त्याचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात आढळून आला. यानंतर भंडारा पोलिसांना तपासाअंती तीन आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा