Russia-Ukraine war : रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ११२ मुलांचा मृत्यू, १४० जखमी | पुढारी

Russia-Ukraine war : रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ११२ मुलांचा मृत्यू, १४० जखमी

कीव्ह; पुढारी ऑनलाईन

रशियाकडून युक्रेनवर (Russia-Ukraine war) सुरु असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ११२ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १४० मुले जखमी झाली असल्याची माहिती युक्रेनियन अभियोजक जनरल कार्यालयाने (Prosecutor General’s office in Ukraine) दिली आहे. रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरूच आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर वाटाघाटीची चर्चा थांबवल्याचा आरोप केला.

UNICEF ने म्हटले आहे की, रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधून १५ लाखांहून अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबासोबत देश सोडून जावा लागला आहे. बहुतांश युक्रेनियन कुटुंबांनी पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, मोल्दोव्हा आणि रोमानियामध्ये आश्रय घेतला आहे.

दरम्यान, रशियाचे हल्ले (Russia-Ukraine war) सुरुच आहेत. त्यांनी आता युक्रेनच्या पश्चिमेकडील ल्विव्ह शहराजवळ हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शुक्रवारी रशियन सैन्याने कीव्ह शहरातील निवासी भागांवर केलेल्या रॉकेट हल्ल्यांत युक्रेनमधील प्रसिद्ध अभिनेत्री ओक्साना श्वेत्स (वय ६७) यांचा मृत्यू झाला होता. या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर आता रशियाच्या हल्ल्यात एका प्रसिद्ध बॅले डान्सरचा मृत्यू झाला आहे. आर्टिओम डॅटसिशिन (Ukrainian ballet dancer Artyom Datsishin) असे त्यांचे नाव आहे. तीन आठवड्यांपूर्वी रशियन सैनिकांच्या गोळीबारात जखमी झालेल्या डॅटसिशिन यांचे गुरुवारी निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते, असे वृत्त एका न्यूज पोर्टलने दिले आहे.

Artyom Datsishin हे युक्रेनच्या नॅशनल ऑपेरामध्ये प्रमुख नर्तक होते. पण रशिया- युक्रेन संघर्षात त्यांना जीव गमवावा लागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या मते, युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून सुमारे ६०० नागरिक मारले गेले आहेत आणि १ हजारहून अधिक जखमी झाले आहेत. पण प्रत्यक्षात जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : रशिया -युक्रेन युद्ध :पुढे काय होणार?|What effect will the Russia-Ukraine crisis have on the world?

Back to top button