जळगाव, पुढारी वृत्तसेवा : धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरात व परिसरात भुसावळ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या दरम्यान, दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला घातक शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक देशी कट्टा व चाकू, सुरे, मोबाईल असे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई नॅशनल हायवेवरील गोलानी कॉम्प्लेक्सजवळील ब्रिज परिसरात केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, बाजारपेठ पोलीस स्टेशन, पोलीस नाईक यासीन पिंजारी, पोलीस नाईक रमण सुरळकर यांच्या सह आरसीपी पथकातील स्टाफला माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता एकूण ५ आरोपी संशयास्पदरित्या त्या ठिकाणी मिळून आले. या वेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने त्यातील पाचही जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले.
यावेळी आफाक पटेल (वय २६, रा. खडका रोड), सोमेश सोनवणे (वय २८, रा. राकानगर, भुसावळ), नाविद शेख, शकील शेख, (रा. ग्रीन पार्क, भुसावळ), जितू पप्पू पिवाल (रा. वाल्मिकनगर, भुसावळ) व अन्य एकाला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एक देशी कट्टा, चाकूसारखे घातक हत्यार आढळून आले. या आरोपींनी महामार्गावर दरोडा घालण्यासाठी पूर्व तयारीनिशी आल्याची कबुली दिली.
आरोपींकडून देशी कट्टा, चाकू, २ मोटरसायकल्स, काही संशयास्पद मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस नाईक यासिन पिंजारी, पोलीस नाईक रमण सुरळकर यांनी केली.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट