चंद्रपूर : पुण्याची शुद्ध मराठी, आम्हची पिवर मराठी : विजय वडेट्टीवार | पुढारी

चंद्रपूर : पुण्याची शुद्ध मराठी, आम्हची पिवर मराठी : विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : झाडीबोली ही एक हदयाला भिडणारी भाषा आहे. मात्र, या भाषेची इतिहासाने दखल घेतली नाही. पुण्यातील मराठी शुद्ध आहे. पण आम्हची मराठी पिवर आहे. ही पिवर मराठी बोलताना कुणी बघीतलं की, तो हमखास म्हणेल, “भाऊ तू झाडीतला हो का?”, हे वेगळे पण झाडीबोली भाषेमध्ये आहे. आपल्या माणसाला आपुलकीनं जवळ करून घेणारी भाषा म्हणजे ती आपली झाडीबोली आहे. माणसं धर्मानी जोडली जात नाही, तर भाषेनी जोडली जातात, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केले. ते २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात बोलत होते.

चंद्रपूर जिल्ह्यात मुल तालुक्यातील जूनासूर्ला येथे २९ वे झाडीबोली साहित्य संमेलनाला आजपासून (दि. १३) सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे, डॉ. हरीचंद्र बोरकर, डॉ. हेमकृष्णजी कापगते, संतोष सिंह रावत, रंजित समर्थ, घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार, राजू मारकवार, अरूण झगडकर उपस्थित होते.

संमेलनाला संबोधित करताना वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले की, “आपली भाषा माय म्हणायला शिकविते. जिथे माय आहे, तिथे कशाचीच कमी नाय आहे. ही आपली भाषा आहे. ही भाषा जपण्याचं अन् तिला नावलौकिक मिळवून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने झाडीबोली भाषा बोलली जाते. या भाषेत अनेक साहित्याची निर्मिती झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्या कोसे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तर रत्नाकर चौधरी यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

Back to top button