

धुळे, पुढारी वृत्तसेवा : महामार्ग सुरक्षा पथकातील उपनिरीक्षकावर चाकूहल्ला करणाऱ्या तरुणास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. शुभम कुटे असे त्याचे नाव आहे. संशयित आराेपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
धुळे शहरातील मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांची नुकतीच महामार्ग सुरक्षा पथकात बदली झाली होती . ते त्यांच्या दुचाकीने धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळील श्रीराम पेट्रोल पंपाजवळून जात हाेते. यावेळी समोरून येणार्या एका दुचाकीस्वाराने त्यांना हुलकावणी दिली. मिर्झा यांनी वर्दळीच्या भागात दुचाकी हळू चालविण्यास त्या दुचाकीस्वाराला सूचना केली. युवकाने साध्या वेशात असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मिर्झा यांच्याबरोबर वाद घातला. धारदार चाकूने मिर्झा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यानंतर ताे घटनास्थळावरून पसार झाला.
जखमी असून देखील मिर्झा यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्या तरुणाचा फोटो काढला. हल्लेखोर पळल्यानंतर नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली. तातडीने धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी मिर्झा यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मोबाईलमधील फोटोच्या आधारावर जुने धुळे भागातून शुभम कुटे याला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…