नंदुरबार : महिंद्रा पिकअपसह 14 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, दोघांना बेड्या | पुढारी

नंदुरबार : महिंद्रा पिकअपसह 14 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, दोघांना बेड्या

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा : मद्याचा अवैध साठा वाहून नेणाऱ्या महिंद्रा पिकपसह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मसावद पोलीस ठाण्यातील पथकाने जळगाव रस्त्यावर ही कारवाई केली.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना अवैध मद्यसाठा वाहून नेणाऱ्या महिंद्रा पिकअपविषयी खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेशीत केले. म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुनिल बिहाडे व पोलीस अमंलदारांचे एक पथक घेऊन म्हसावद ते धडगांव रोडवर उनपदेव फाट्याजवळ सापळा लावला. त्यावेळी एका संशयास्पद वाहनाला अडवून चौकशी करण्यात आली. पाहणी केली असता खाकी रंगाचे पुठ्ठ्याचे खोके रचलेले आढळले. ते खोके उघडून पाहिले असता त्यामध्ये दारू आढळून आली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांना दारु वाहतुकीचा परवाना आहे काय ? असे विचारले असता त्यांच्याकडे दारु वाहतुकीचा परवाना नसल्याचे समजले.

एकुण 13 लाख 95 हजार 290 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन म्हसावद पोलीस ठाण्यात या वाहनाचा चालक हिंमत रोहिदास पवार (वय 24) रा. बिलगांव ता. धडगांव जि. नंदुरबार व खिमजी रमसिया राठोड (वय-25) मु. केलदी किमला पो. बखतगड ता. सांडवा जि. अलिराजपुर मध्य प्रदेश यांच्याविरुध्द् महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उप निरीक्षक सुनिल विहाडे, असई/गुलाब पावरा, पोलीस हवालदार भिमसिंग ठाकरे, सुनिल बागुल, काशिनाथ साळवे, पोलीस नाईक घनश्याम सुर्यवंशी, सचिन तावडे यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

Back to top button