वाशिम अपघात : वऱ्हाडावर काळाचा घाला, पीकअपची उभ्या ट्रॅक्टरला धडक, एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार | पुढारी

वाशिम अपघात : वऱ्हाडावर काळाचा घाला, पीकअपची उभ्या ट्रॅक्टरला धडक, एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

वाशिम अपघात – लग्नाला गेलेल्या वऱ्हाडी पीक अपला अपघात होऊन एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार – वाशिम रस्त्यावर घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (वाशिम अपघात)

भारत शंकर गवई (वय ३७), पुनम भारत गवई (३२) सम्राट भारत गवई (६) हे एकाच कुटुंबातील ३ जण तर सोमनाथ कोरडे हा चालक ठार झाला आहे. शंकर गवई, ऋषभ खिल्लारे, महादेव गवई, रणजित गायकवाड, संदेश रोकडे, अजय खिल्लारे, महादेव गवई, गणेश गवई, गणेश गायकवाड, धनराज तायडे हे जखमी झाले आहेत. जखमींना वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

शेलू बाजार वरून वाशिमला येत असताना पीक अप या प्रवासी वाहनाची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला सोयता नजीक जोरदार धडक बसून भीषण अपघात घडला. या अपघातात सावंगा जहांगीर येथील एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. तर इतर ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यातील ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अकोला इथं पाठविण्यात आलं आहे.

अपघात घडल्यानंतर वाहनाचा चक्काचूर झाल्यावर वाहनातील जखमींना वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन चमूने काढून वाशिमच्या हॉस्पिटलमध्ये पाठविले.

विशेष म्हणजे अपघात घडलेले ठिकाण सोयता आणि मृतक असलेल्या कुटुंबाचे गावं सावंगा जहांगीर या दोन गावांचे अंतर अगदी ४ किलोमीटर आहे.

Back to top button