जागतिक पाणथळ दिन : पाणथळ जागांचे जतन महत्त्वाचे | पुढारी

जागतिक पाणथळ दिन : पाणथळ जागांचे जतन महत्त्वाचे

पृथ्वीवरील 3 टक्के भूभाग व्यापलेल्या पाणथळ जागा जंगलांपेक्षा दुप्पट प्रमाणात कार्बन शोषून घेतात. म्हणूनच हवामान बदल, शाश्वत विकास आणि जैवविविधतेसंदर्भात त्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारीला साजरा झाला. मानव आणि पृथ्वीसाठी पाणथळ जागांचे गांभीर्यपूर्ण महत्त्व आहे, याबाबत जाणीव वाढीस लागावी, यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. त्याशिवाय 1971 मध्ये इराणमधील रामसर शहरात रामसर परिषदेत पाणथळ संवर्धनाबाबतच्या ठरावावर स्वाक्षर्‍या झाल्या, त्या घटनेची आठवण म्हणूनदेखील हा दिन साजरा करतात. जगातील आर्थिकद़ृष्ट्या सर्वात मौल्यवान परिसंस्था आणि जागतिक हवामानाच्या नियामक म्हणून कार्य करणार्‍या पाणथळ जागा जंगलांपेक्षा तिप्पट वेगाने नाहीशा होत आहेत. पाणथळ जागांच्या उपयुक्ततेबाबत आपल्याला अजूनही संपूर्ण समज आलेली नाही.

पृथ्वीवरील जमिनीपैकी केवळ 3 टक्के भूभाग व्यापलेल्या या पाणथळ जागा जंगलांपेक्षा दुप्पट प्रमाणात कार्बन शोषून घेतात. या पाणथळ जागा किनारपट्टी भागांचे संरक्षण करून पुरासारख्या आपत्तींचा धोका कमी करतात.

पाणथळ परिसंस्थांमध्ये किमान 14 जातींचे समुद्री गवत, 69 प्रकारच्या खारफुटी वनस्पती, 200 वर लहान समुद्री जीव, 512 प्रकारचे छिद्री जीव, 1042 प्रकारचे जेलीफिशसद़ृश प्राणी, 55 हजार 525 प्रकारचे कवच नसलेले मऊ शरीरधारी जीव, 2394 प्रकारचे कवचधारी जीव, 2629 प्रकारचे मासे, 37 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 243 प्रकारचे पक्षी आणि 24 जातींचे सस्तन जीव आढळून आले. भारतातील खारफुटी जंगलांमध्ये पुष्पधारी वनस्पतींच्या 925 जाती आणि प्राणीवर्गातील विविध 4107 जाती आहेत. भारतात सापडणारे स्क्लेराक्टिनिया प्रकारचे प्रवाळ उष्णकटिबंधीय इतर प्रवाळांच्या तुलनेत अधिक वैविध्यपूर्ण आहे. देशातील प्रवाळ असलेल्या महत्त्वाच्या भागांमध्ये किमान 478 जातींचे जीव सापडले आहेत.

दरवर्षी स्थलांतर करणार्‍या लाखो पक्षांचे थवे भारतात येतात आणि त्यांच्या या वार्षिक घटनाक्रमात पाणथळीच्या जागा अत्यंत महत्त्वाच्या असतात. पाणथळ जागांच्या प्रकारांतील वैविध्य हे या पक्ष्यांसाठी आवश्यक मुुक्कामाची ठिकाणे मिळवून देतात. त्या बदल्यात हे स्थलांतर करणारे पक्षी त्यांच्या जीवनचक्राच्या विविध टप्प्यांवर ज्या पाणथळ जागी वास्तव्य करतात तेथील साधनसंपत्तीचा प्रवाह, विविध जीवांचे स्थलांतर, पोषक द्रव्यांची निर्यात, अन्न-साखळीची रचना इतकेच नव्हे, तर सांस्कृतिक नातेसंबंधांना आकार देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

मध्य आशियाई स्थलांतर मार्ग हा जगातील पाणपक्ष्यांच्या नऊ प्रमुख स्थलांतर मार्गांपैकी एक असून यात सायबेरियातील प्रजनन स्थळांपासून अतिदक्षिणेकडे पश्चिम आणि दक्षिण आशिया, मालदीव आणि ब्रिटिश हिंद महासागरी प्रदेशातील (सीएमएस) अप्रजनन स्थळांकडे प्रवास करण्यासाठीच्या स्थलांतर मार्गांचा समावेश आहे. मध्य आशियाई स्थलांतर मार्गावरून प्रवास करणार्‍या स्थलांतरित पाणपक्ष्यांपैकी सुमारे 71 टक्के पाणपक्षी तात्पुरत्या मुक्कामाचे ठिकाण म्हणून भारताचा वापर करतात. म्हणूनच या स्थलांतर मार्गाचा वापर करणार्‍या पाणपक्ष्यांच्या समुदायांमध्ये सातत्य राखण्यासाठी भारतातील पाणथळ जागांचे आरोग्य टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

परिसंस्थेच्या द़ृष्टीने पाणथळ जागा अत्यंत महत्त्वाच्या असूनही पाण्याचा निचरा, प्रदूषण, अनिर्बंध वापर, आक्रमणकारी जीव-जाती, जंगलतोड आणि जमिनीची धूप अशा विविध कारणांमुळे जागतिक पातळीवर पाणथळींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाणथळ जागांचा उल्लेख चाणक्याच्या अर्थशास्त्रातदेखील आहे. तेथे या जागांना ‘अनुप’ म्हणजे उपमा अथवा तुलना नसणार्‍या जागा असे संबोधले असून त्यांना पवित्र समजले गेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वततेला विकासाच्या महत्त्वाच्या पैलूचा मान दिल्यापासून भारतातील पाणथळजागांच्या देखभालीमध्ये मोठी सुधारणा दिसून आली आहे. आपला देश आता 47 रामसर स्थळे असलेला देश झाला आहे. दक्षिण आशियातील कोणत्याही देशांच्या तुलनेत आपल्या देशात रामसर स्थळांचे सर्वात मोठे जाळे बघायला मिळते. रामसर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची असलेली पाणथळ जागा.

भारताच्या राष्ट्रीय वन्यजीव कृती योजनेमध्ये (2017-2031) आंतरदेशीय जलीय परिसंस्थांच्या जतनाला प्राधान्यक्रमाच्या 17 विषयांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे आणि राष्ट्रीय पाणथळ अभियान तसेच राष्ट्रीय पाणथळ जैवविविधता नोंदणी याच्या विकासाला महत्त्वाचे हस्तक्षेप म्हणून परिकल्पित केले आहे. पाणथळ आपल्या जलसाठ्यांना शुद्ध करते आणि त्यांचे पुनर्भरण करते, तसेच करोडो लोकांचे अन्न असणारे मासे आणि भात यांची जोपासना करण्यासाठीची उत्तम जागा उपलब्ध करून देते. हे मुद्दे गांभीर्याने लक्षात घेऊन हवामान बदलाबाबतच्या राष्ट्रीय कृती योजनेमध्ये पाणथळ संवर्धन, तसेच शाश्वत व्यवस्थापन अंतर्भूत असलेल्या राष्ट्रीय जल अभियान आणि हरित भारत अभियानाचा समावेश केला आहे. 2017 मध्ये केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 अंतर्गत, पाणथळ जागा (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियमांतील तरतुदींनुसार राज्यांमध्ये याविषयीचे कामकाज बघण्यासाठी प्रमुख धोरण विषयक आणि नियामकीय संस्था म्हणून राज्य पाणथळ प्राधिकरणांची स्थापना केली आहे. वर्ष 2020 मध्ये केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने परिवर्तनीय संकल्पना म्हणून पाणथळ पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला. पायाभूत माहिती विकास, विवक्षित मानक संचाच्या वापरातून पाणथळ जागांच्या परिस्थितीचे जलद मूल्यमापन करणारी पाणथळ आरोग्य कार्डे, पाणथळ मित्र संकल्पनेतून विविध सहभागींना मंच उपलब्ध करून देणे आणि व्यवस्थापन नियोजन, असा हा कार्यक्रम आहे. त्यात 500 हून अधिक पाणथळ जागांचा समावेश केला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या कार्यक्रमांचा भाग म्हणून पाणथळ मित्रांची नोंदणी केली आहे. पाणथळ जागांचे महत्त्व आणि त्यांना असलेला धोका सांगणारे फलक लावले आहेत.

पाणथळ जागांचे व्यवस्थापन करणारे तसेच इतर भागधारकांच्या वापरासाठी पाणथळविषयक माहिती केंद्र म्हणून राष्ट्रीय पाणथळ पोर्टल (https://indianwetlands.in/) विकसित केले आहे. भारत सरकार पाणथळ संवर्धनाला मोठे महत्त्व देत आहे आणि म्हणून विकासविषयक नियोजन आणि निर्णय प्रक्रियेच्या सर्व पातळ्यांवर पाणथळ या विषयाच्या मूल्यांचा मुख्य प्रवाहात समावेश व्हावा, या द़ृष्टीने प्रयत्न करत आहे.

– ना. भूपेंद्र यादव
(केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल, रोजगारमंत्री)

Back to top button