रत्नागिरी : सॅटेलाइट टॅगिंग करुन मादी कासवाला सोडले समुद्रात | पुढारी

रत्नागिरी : सॅटेलाइट टॅगिंग करुन मादी कासवाला सोडले समुद्रात

गुहागर; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास येथे दोन ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना सॅटेलाइट टॅगिंग केल्यानंतर सोमवारी (दि.15) गुहागरच्या समुद्रात हा उपक्रम राबविण्यात आला. वन्यजीव अभ्यासक डॉ. सुरेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली मादीला सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले. वनश्री असे नाव ठेवून या कासवाला सायंकाळी समुद्रात सोडण्यात आले.

कोकणातील समुद्र किनारी अंडी घालण्यासाठी येणारी कासवे नंतर काय करतात? त्यांचा प्रवास कसा असतो? विणीच्या एकाच हंगामात एकापेक्षा जास्त वेळा ते कासव पुन्हा त्याच समुद्रावर अंडी घालण्यास येते का? मे महिन्यानंतर ही कासवे कोणत्या भागातील खोल समुद्रात जातात? आदी विषयांचा अभ्यास करण्यासाठी सॅटेलाइट टॅगिंगचा उपक्रम राबविला जात आहे. जानेवारी अखेरीस वेळास येथे दोन मादी कासवांना टॅगिंग करण्यात आले. त्यानंतर आज गुहागरमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

भारतीय वन्यजीव संस्था, वन खाते आणि कांदळवन संरक्षण संस्था या तीन संस्थाचे अधिकारी, कर्मचारी सोमवारी रात्रभर समुद्रावर गस्त घालत होते. पहिल्याच दिवशी गुहागर वरचापाट परिसरात अंडी घालण्यासाठी आलेले कासव सापडले. अंडी घातल्यानंतर या कासवाला पकडण्यात आले. त्याच्या पाठीवर सॅटेलाईट टॅगिंगसाठीचे यंत्र लावण्यात आले. मंगळवारी सायंकाळी या मादीला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

यावेळी कांदळवन कक्ष, मुंबईचे अप्पर प्रधान वनरक्षक डॉ. विरेंद्र तिवारी, उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी, मुंबई, दिलीप खाडे, विभागीय वनाधिकारी रत्नागिरी, सचिन निलख विभागीय सहाय्यक वनाधिकारी रत्नागिरी, राजश्री कीर परिक्षेत्र वनाधिकारी चिपळूण, राजेंद्र पाटील परिक्षेत्र वनाधिकारी कांदळवन कक्ष, गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, रामदास खोत वनपाल चिपळूण, संतोष परशेट्ये वनपाल गुहागर, अरविंद मांडवकर आणि संजय दुंडगे वनरक्षक गुहागर, नीलेश बापट मानद वन्यजीव रक्षक चिपळूण, कासवमित्र संजय भोसले व हृषिकेश पालकर गुहागर, मोहन उपाध्ये वेळास, अभिनय केळस्कर आंजर्ले, यांच्यासह कासवप्रेमी उपस्थित होते.

Back to top button