शेगाव : डिजेला मज्जाव केल्याने शेगाव पोलीस ठाण्यात दोन महिलांसह सहा जणांचा ‘हैदोस’ | पुढारी

शेगाव : डिजेला मज्जाव केल्याने शेगाव पोलीस ठाण्यात दोन महिलांसह सहा जणांचा 'हैदोस'

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : मध्यरात्रीच्या सुमारास भरवस्तीत सुरू असलेला डीजेचा दणदणाट पोलीसांनी थांबवल्याने काही लोकांनी रात्री शेगाव पोलीस ठाण्यात येऊन धुडगुस घातला आणि तेथील फर्निचरची तोडफोड व कागदपत्रांची फेकाफेक केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शेगाव शहरातील विश्वनाथनगरमध्ये काल रविवारी मध्यरात्री एका घरासमोर वाढदिवसाच्या कार्यक्रमात डिजेचा दणदणाट सुरू होता. या प्रकाराला वैतागलेल्या काही स्थानिक नागरिकांनी डिजेच्या गोंगाटाची  तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलीसांनी  विश्वनाथनगरात जाऊन संबंधित डिजे बंद केला. यावेळी डिजेवर अनेकांचे नाचगाणे सुरू होते. पोलीसांनी मज्जाव केल्याने  चिडलेल्या काही लोकांनी पोलीसांशी वाद घातला. यापैकी एकाला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यावर घेऊन आले. त्यापाठोपाठ डिजे समर्थकांच्या एका गटाने शेगाव पोलीस ठाण्यात येऊन प्रचंड धुडगुस घालत तेथील फर्निचरची तोडफोड करून स्टेशन डायरीची फेकाफेक केली.

ही घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली असून; चार पुरूष व दोन महिला धुडगुस घालतांना स्पष्ट दिसत आहेत. याप्रकरणी पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तपासात आणखी आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत.अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक श्रावण दत्त यांनी दिली.

हेही वाचलतं का? 

Back to top button