

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, BCCI अध्यक्षपदाच्या कार्यकाळावरून मला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा निर्णय द्यायचा नाही. माझ्या पदाबाबतचा निर्णय जनता घेईल, असे त्यांनी म्हटले आहे.
टीम इंडियाचे माजी कर्णधार गांगुली (Sourav Ganguly) यांची ऑक्टोबर २०१९ मध्ये BCCI च्या अध्यक्षपदी औपचारिकपणे निवड झाली. आंतरराष्ट्रीय दौ-यांचे आयोजन, कोविडच्या आव्हानांना सामोरे जात आयपीएल स्पर्धा यशस्वी पार पाडणे हे गांगुलींचे अध्यक्ष म्हणून सर्वात मोठे यश आहे. मात्र, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वादामुळे गांगुलींच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
BCCI च्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) कार्यकाळ या वर्षाच्या अखेरीस संपणार आहे. स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीत ते भविष्यातील BCCI अध्यक्ष पदाच्या निवडीवरून म्हणाले की, 'पुढील अध्यक्ष कोण असेल? असा प्रश्न मला विचारण्यात येत आहे. हे बघा, मला आत्ता याविषयी काहीही बोलायचे नाही. पुढे काय होते ते पाहू. माझ्या कार्यकाळाकडे तुम्ही कसे पाहता हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण गेल्या दोन वर्षांत माझा कार्यकाळ कोविड-१९ मुळे कठीण परिस्थितीत गेला आहे. या साथीच्या रोगाने जगभर हाहाकार माजवला आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही अजूनही बहुतांश क्रिकेट स्पर्धा पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत.'
सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) कार्यकाळात, बीसीसीआयला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन यशस्वी आयपीएल आयोजित करण्यात यश आले. आता पुन्हा एकदा त्यांच्यासमोर आयपीएल २०२२ चे यशस्वी आयोजन करण्याचे आव्हान आहे. या सर्व यशांव्यतिरिक्त, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा महान फलंदाज विराट कोहलीसोबतचा नुकताच झालेला वाद हे त्याच्या कार्यकाळातील आणखी एक वैशिष्ट्य आहे. सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्यासाठीने भारतीय क्रिकेटने एक वेगळी उंची गाठली. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने देशांतर्गत दिवस-रात्र कसोटी सामने खेळले.