‘त्यांची’ भावनिक साद उद्धव ठाकरे यांच्या हृदयाला भिडली

'His' emotional call touched Uddhav Thackeray's heart
'His' emotional call touched Uddhav Thackeray's heart
Published on
Updated on

भगवा पुन्हा खांद्यावर घेण्यासाठी बाबर यांना करावे लागले वेटिंग

 पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात शिवसेनेने उमेदवारी नाकारून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली.

त्यावेळी शिवसेनेच्या तिकिटासाठी पैसे दिले गेल्याचा आरोप करत शिवबंधन तोडून मनसेत प्रवेश केलेले माजी खासदार गजानन बाबर यांना त्यांच्यातला हाडाचा शिवसैनिक स्वगृही परतण्यास सांगत होता.

उमेदवारी नाकारल्यानंतर रागाच्या भरात घेतलेला तो निर्णय चुकीचा होता, अशी कबुली देत व मला शिवसैनिक म्हणूनच मरायचे आहे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी मातोश्रीला पक्षप्रवेशासाठी साद घातली होती.

मात्र, त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षात गटबाजी वाढेल, असे सांगत एका गटाने विरोध केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोडे थांबले होते.

मात्र, मला शिवसैनिक म्हणूनच मरायचे आहे, ही साद ठाकरे यांच्या हृदयाला भिडली आणि भगव्यातच मरायचे, हे बाबर यांचे स्वप्न पूर्ण झाले.

खरे तर गजानन बाबर हे शहर शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक. पक्ष निष्ठेच्या बळावर ते तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले.

जनमाणसात मिसळणे, 24 तास उपलब्धता, एखाद्या कार्यक्रमास बोलावले की आवर्जून उपस्थिती दर्शवणे, स्वतःहून फोन घेणे ही त्यांची कामाची पद्धत कार्यकर्त्यांना स्तुत्य वाटायची.

मात्र, बाबर स्वयंकेंद्रित राजकारण करत असल्याचा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा आक्षेप होता. त्यामुळे पक्षात त्यांचे विरोधक वाढत गेले. बाबर यांनी कार्यकर्त्यांना मोठे करण्याऐवजी आपले बंधू मधुकर बाबर, प्रकाश बाबर, वहिनी शारदा बाबर यांना मोठे केले.

सन 2012 च्या महापालिका निवडणुकीत गजानन बाबर यांचे पुतणे योगेश बाबर यांना उमेदवारी मिळाली. परंतु, पराभूत होऊनही पिंपरी शहर प्रमुखपद दिले गेले. या सर्व गोष्टींना पक्षातील एका गटाचा आक्षेप होता.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाबर यांना तिकीट नाकारले तेव्हा सुरुवातीस त्यांची पाठराखण केलेल्या योगेश बाबर यांनी प्रचारादरम्यान बारणे यांच्या गोटात सामील होत पक्षनिष्ठेचा सूर आळवला.

मधुकर बाबर यांनीही भाजपमधून शिवसेनेत प्रवेशासाठी हा अचूक मुहूर्त साधला. त्यांनी भाषणे करताना आपण बिभीषण असल्याचे सांगत गजानन बाबर यांना रावण ठरविले. बाबर यांच्या वहिनी नगरसेविका शारदा बाबर, प्रकाश बाबर मात्र गजानन बाबर यांच्या पाठीशी उभे राहिले.

मनसेत प्रवेश करून शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारात सहभागी झालेल्या बाबर यांची मनसेत गोची झाली. त्यांनी स्वगृही परतण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पिंपरी मनपाच्या काळभोरनगर-मोहननगर पोटनिवडणुकीत त्यांचे समर्थक विजय गुप्ता यांना उमेदवारी मिळाली. तेव्हा बाबर प्रचारात उतरले. ते सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली.

मात्र, गुप्ता पराभूत झाल्याने सारे प्रयत्न थांबले. विद्यानगर पोटनिवडणुकीत शिवसेनेचे राम पात्रे यांच्या विजयानंतर त्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात होता.

मात्र, पुण्यात विनायक निम्हण यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला असताना दुसरीकडे बाबर यांना मात्र वेटिंगवर ठेवण्यात आले होते.मातोश्रीवर झालेल्या बैठकीत बाबर यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा विषय झाला.

45 वर्षे काम केलेल्या बाबर यांचा 2017 च्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश झाला तर पक्षाला फायदा होईल, असा युक्तीवाद झाला. मात्र, एका गटाकडून विरोध झाल्याने निर्णय झाला नाही.

दरम्यानच्या काळात भाजपच्या लोकांनी संपर्क साधूनही बाबर यांनी त्यांना दाद दिली नाही, कारण ते म्हणत मला काहीच नको मला फक्त शिवसैनिक म्हणून मरायचे आहे.

त्यांची ही भावनिक साद उद्धव ठाकरे यांच्या हृदयाला अखेर भिडली. भगवा पुन्हा खांद्यावर घेण्यासाठी संघर्ष केलेल्या बाबर यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news