यवतमाळ : भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार; मांत्रिकाविरुद्ध गुन्हा | पुढारी

यवतमाळ : भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार; मांत्रिकाविरुद्ध गुन्हा

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेला भूतबाधा झाल्याचे भासवून तिच्यावर मंत्रोपचार करण्यासाठी आलेल्या मांत्रिकानेच अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे या मांत्रिकाने भूत शक्तीशाली आहे, असे सांगून महिलेच्या नातेवाइकांना घराबाहेर काढले व तिथेच रात्रभर तिचे शोषण केले. यवतमाळातील नागपूर रोड परिसरात राहणाऱ्या महिलेला तिची प्रकृती चांगली राहत नसल्याने पतीने घराबाहेर काढले. आई-वडील नसल्याने ती महिला नातेवाइकांकडे आश्रयाला होती. वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण सांगून तिच्याच एका नातेवाइकाने तेलंगणातील आदिलाबाद येथून ओळखीच्या मांत्रिकाला पाचारण केले.

शेखरअण्णा (२९, रा. आदिलाबाद) हा मांत्रिक त्याच्या दोन चेल्यांना घेऊन यवतमाळात आला. गुरुवारी (ता. २७) या मांत्रिकाने पीडित महिलेची तपासणी केली. महिला सुस्वरूप असल्याचे पाहून मांंत्रिकाने डाव रचला. या महिलेला भूतबाधा झाली असून, हे पिश्याच्य तत्काळ बाहेर काढणे गरजेचे आहे. हे भूत मोठे शक्तीशाली आहे. त्याच्यापासून केवळ त्या महिलेची सुरक्षा करू शकतो. महिलेवर मंत्रोपचार करताना चिडलेली भूत तेथे उपस्थित इतरांना नुकसान पोहोचवू शकते. त्यातून झालेल्या नुकसानीची जबाबदारी माझी नाही, असे मांत्रिकाने सांगितले.

यावर उपायाची विचारणा महिलेच्या कुटुंबियांनी केली असता, महिलेला व मला एकांतवास हवा. तेथेच हा विधी करता येईल, असे सांगितले. भाबड्या नातेवाइकांनी यावर विश्वास ठेवून स्वत:चे घर व त्या पीडित महिलेला मांत्रिकाच्या ताब्यात दिले. मांत्रिकाने पीडित महिलेवर रात्रभर अत्याचार केला. यामुळे महिला आणखीच धास्तावली. तिला काहीच सुचेनासे झाले. सकाळी मांत्रिक व त्याचे साथीदार पसार झाले. भानावर आल्यानंतर महिलेने आपबिती आपल्या नातेवाइकांजवळ सांगितली. अखेर पीडित महिलेला घेऊन नातेवाइकांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी मांत्रिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री सुरू होती.

हेही वाचलतं का?

Back to top button