नागपुरातील रॅन्चोची कलाकारी; भंगारातून बनवली रेसींग कार | पुढारी

नागपुरातील रॅन्चोची कलाकारी; भंगारातून बनवली रेसींग कार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील एका ध्येयवेड्या तरुणाने भंगारातील सामानातून स्वतःची कार तयार केली आहे. विशेष म्हणजे ही कार साधीसुधी नसून चक्क फॉर्म्युला वन रेसमध्ये धावणारी स्पोर्ट रेसींग कार आहे. स्वप्निल काशिनाथ चोपकर असे या तरुणाचे नाव आहे. २६ वर्षीय स्वप्नील नागपुरातील रामेश्वरीच्या पार्वती नगर येथे राहतो.

काही वर्षांपूर्वी स्वप्नीलने स्वतःच्या कमाईने कार विकत घेण्याचा स्वप्न बघितले होते. परिस्थितीमुळे ते शक्य होऊ शकले नाही, म्हणून त्याने भंगारातून कार आणि दुचाकीचे पार्ट्स विकत आणून चक्क फॉर्म्युला वन रेसींग कार तयार करून दाखवली आहे. स्वप्निलला ही कार तयार करताना असंख्य अडचणी आल्या मात्र त्यावर त्याने यशस्वी मात केली.

स्वप्नील हा ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असताना त्याला स्वतःची कार तयार करण्याची कल्पना सुचली. नोकरी करताना जमवलेल्या पैशातून त्याने भंगाराच्या दुकानातून कारचे इंजिन, शॉकअप, चाक, सायलेन्सर अशा अनेक वस्तू गोळा करण्यात सुरुवात केली. कार तयार करण्याचा कोणताही अनुभव नसल्याने स्वप्नील अनेक वेळा चुकला. मात्र मार्गदर्शकांनी केलेल्या सूचनांचे पालन करून त्याने अखेर कार तयार करून दाखवली. फॉर्म्युला वन रेसिंग कार तयार करण्यासाठी स्वप्नीलला एक ते सव्वा लाखांचा खर्च आला आहे.

स्वप्नीलने तयार केलेली फॉर्म्युला वन रेसिंग कारमध्ये ८०० सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे. ती १९ किलोमिटर प्रति लिटर मायलेज देत आहे. तर सध्या ही कार १४० किलोमीटर प्रतितास धावू शकते, असा दावा त्याने केला आहे. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करून स्पीड आणि मायलेज वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले आहे

 

Back to top button