Aditya Thackeray यांच्या कडून बहुचर्चित लोखंडी पुलाची पाहणी | पुढारी

Aditya Thackeray यांच्या कडून बहुचर्चित लोखंडी पुलाची पाहणी

इगतपुरी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर येथील दुर्गम सावरपाडा भागातील महिलांना फक्त पाणी भरण्यासाठी लाकडाच्या ओंढक्यावरुन प्रवास करावा लागत होता. ही बाब निदर्शनास आल्यावर अवघ्या राज्यभराती माध्यमांनी या घटनेची दखल घेतली होती. यानंतर येथे लोकसहभागातून साकारलेल्या सावरपाडा व सेंद्रीपाडा यांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाची पाहणी राज्याचे पर्यांवरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. यावेळी त्यांनी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील वाड्या – पाड्यांपर्यंत पाणी पोहचवणार असल्याची घोषणा केली.

या पुलाच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, या भागात पाऊस जास्त पडतो, परंतु पाणी साठवण्यासाठी योग्य उपाययोजना नसल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावतो. आज प्रत्यक्ष भेटीतून या भागातील लोकांच्या समस्या जास्त जवळून जाणून घेता आल्या. या आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दुर्गम भागात डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. जलजीवन योजनेच्या माध्यमातून येत्या तीन महिन्यांत या वाड्या-पाड्यातील प्रत्येक घराच्या दारापर्यंत आपण पाणी पोहचवणार असल्याची ग्वाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिली.

आदिवासी वाड्या- पाड्यातील ग्रामस्थांची नाळ ही पर्यावरणाशी जोडली गेली आहे. त्यामुळे आदिवासी वाड्या- पाड्यांचे जतन करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. शेतीला प्राधान्य देवून आदिवासी वाड्या-पाड्यात रस्ते, वीज व पाणी या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच या भागात पर्यटन विकासाच्या दृष्टीने शासनस्तरावर नक्कीच प्रयत्न केला जाईल. तसेच शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करताना शहरांसोबतच खेडी व वाड्या-पाड्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून विकास साधणार : कृषीमंत्री दादाजी भुसे

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे, परंतु पाणी साठवण बंधारे, शेततळी या भागात तयार केल्यास निश्चितच त्याचा उपयोग आदिवासी बांधवांना शेतीसाठी होईल. आदिवासी भागाच्या विकासासाठी कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील राहू, असे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, आ. हिरामण खोसकर, नरेंद्र दराडे, सुहास कांदे, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावीत, काशिनाथ मेंगाळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

 

Back to top button