Chandrakant Patil : संजय राऊत, मंत्री अनिल परब यांच्या विरोधात अवमानकारक याचिका दाखल करणार | पुढारी

Chandrakant Patil : संजय राऊत, मंत्री अनिल परब यांच्या विरोधात अवमानकारक याचिका दाखल करणार

गारगोटी ; पुढारी वृत्तसेवा : आमदारांचे केलेले निलंबन घटनाबाह्य असून सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे खा. संजय राऊत, मंत्री अनिल परब यांना पोटशूळ उठले आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य करणार्‍या खा. संजय राऊत व मंत्री अनिल परब यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणावरून अवमानकारक याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खानापूर येथे पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली. (Chandrakant Patil)

गतवर्षी जुलै महिन्यात अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांना न्याय दिला आहे. आमदार म्हणून कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना बहाल केला आहे. मात्र शिवसेना खा. संजय राऊत व परिवहन मंत्री अनिल परब सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वक्तव्य करून न्यायालयाचा अवमान करीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाकडे संपूर्ण देश आदराने पाहत असताना खा. संजय राऊत व मंत्री अनिल परब चुकीची वक्तव्य करत असून न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगीतले.

Chandrakant Patil : तरूण पिढी बरबाद करणारा निर्णय…

यावेळी दुकानात वाईन विक्रीबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयावर टिका केली. तरूण पिढी बरबाद करणारा हा निर्णय असून राज्य सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. भविष्यात रेेशनधान्य दुकानात दारू विक्री करायला लावून शासन जनतेला देशोधडीला लावेल असा आरोप त्यांनी केला. यावेळी भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील, जिल्हा सरचीटणीस प्रविणसिंह सावंत, जिल्हा युवक अध्यक्ष पार्थ सावंत आदी उपस्थित होते.

Back to top button