नागपूर : कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - पुढारी

नागपूर : कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

बुटीबोरी एमआयडीसी नजीक असलेल्या किरमिटी भारकस येथे एका चार वर्षीय चिमुकलीला कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागलाय. या दुर्देवी घटना पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत चिमुकलीचे नाव अंजली रामसोदर रावत (वय ४) असे आहे. रावत कुटुंब हे मध्य प्रदेश येथील रहिवासी असून भारकस येथे पाच महिन्यांपूर्वी भाड्याने राहायला आले होते. चिमुकलीचे वडील रामसोदर बुटीबोरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करतात.

चिमुकली अंजली ही भारकस येथील रस्त्याने जात असताना तिला अचानक ठेच लागली व ती खाली पडली. त्यामुळे तेथील एक कुत्रा लगेच तिच्या अंगावर धावून आला. त्याने तिला चावायला सुरुवात करत असतानाच पुन्हा दोन कुत्र्यांनी धाव घेतली. कुत्र्याचा चावण्याचा प्रकार सुरू असताना चिमुकलीच्या रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांना ऐकू येताच नागरिकांनी धाव घेतली व तिन्ही कुत्र्यांनी त्या ठिकाणांहून पळ काढला.

कुत्र्यांच्या चावण्यामुळे चिमुकली गंभीर स्वरूपात जखमी झाली. रक्तबंबाळ झाल्याने तिला टाकळघाटातील सरकारी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी नागपूर मेडिकल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. तेथील औषधोपचाराने आराम झाल्यावर तिला सुटी देण्यात आली. नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने नागपूर मेडिकल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Back to top button