डोळ्यांकडे पाहून मृत्यूची भविष्यवाणी करता येणार, संशोधकांचा दावा, ब्रिटिश जर्नलमध्ये माहिती प्रसिद्ध | पुढारी

डोळ्यांकडे पाहून मृत्यूची भविष्यवाणी करता येणार, संशोधकांचा दावा, ब्रिटिश जर्नलमध्ये माहिती प्रसिद्ध

सिडनी : एखाद्याच्या डोळ्यांकडे पाहून मृत्यूची भविष्यवाणी करणे हा प्रकार आपल्याला थोडा अजब वाटू शकेल. मात्र, असे करता येणे शक्य असल्याचे आता दिसून आले आहे. आता डोळ्यांना स्कॅन करून हे समजू शकते की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार आहे.
ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी यासाठी एक नवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कार्यक्रम तयार केला आहे जो एखाद्या माणसाच्या आयुष्यातील वर्षांबाबतची भविष्यवाणी करण्यास मदत करू शकेल.

हे केवळ डोळ्यांच्या रेटिनामागील ऊती पाहून शक्य होईल. ब्रिटिश जर्नल ऑफ ऑप्थल्मोलॉजीमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की रेटिनाबाबतचे संशोधन एखाद्या खिडकीसारखे काम करेल, ज्याच्या सहाय्याने एखाद्या आरोग्याबाबतच्या तपशीलास जाणता येईल. मेलबोर्नच्या सेंटर फॉर आय रिसर्चच्या संशोधकांनी दावा केला आहे की ‘एआय अ‍ॅल्गोरिदम’ सुमारे 19 हजार फंडस् स्कॅनचे विश्लेषण केल्यानंतर रेटिनाच्या वयाचे अचूक अनुमान लावू शकते.

मेलबोर्न विद्यापीठातील डॉ. मिंगगुआंग यांनी सांगितले की रेटिना हा कुणाच्याही मृत्यूची भविष्यवाणी करण्यासाठी सहायक होऊ शकतो. या पाहणीत यूके बायोबँकमध्ये सहभागी झालेल्या लोकांद्वारे दिलेल्या नमुन्यांमधील 1,30,000 पेक्षा अधिक रेटिना प्रतिमांचे विश्लेषण करण्यात आले. 40 ते 69 वर्षे वयोगटातील पाच लाखांपेक्षाही अधिक लोकांची याबाबत दीर्घकाळ पाहणी करण्यात आली.

Back to top button