पुढारी ऑनलाईन
बॉलीवूडमध्ये आतापर्यंत फीचर फिल्म्सचे रिमेक किंवा अॅडेप्टेशनचा टे्ंरड होता. आता नव्या वर्षात अँथॉलॉजी जॉनरच्या चित्रपटांचेही भारतीयीकरण पाहायला मिळणार आहे. याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी रीलिज झालेल्या अमेरिकन अँथॉलॉजी 'मॉडर्न लव्ह'पासून होणार आहे. अँथॉलॉजी म्हणजे अनेक कथांचा मिळून होणारा एक चित्रपट. जसे की आपल्याकडे यापूर्वी 'दस कहानियाँ', 'बॉम्बे टॉकिज', 'लस्ट स्टोरीज', 'घोस्ट स्टोरीज', 'नवरस' असे अँथॉलॉजी चित्रपट येऊन गेले आहेत. तर या नव्या अँथॉलॉजीसाठी सहा भारतीय दिग्दर्शकांची निवड केल्याचे समजते. यात हंसल मेहता, विशाल भारद्वाज, अंजली मेनन, अलंकृता श्रीवास्तव, ध्रुव सहगल आणि शोनाली बोस यांचा समावेश आहे. अँथॉलॉजीच्या विविध कहाणींमध्ये मुख्य भूमिकेत वामिका गब्बी, प्रतीक गांधी, फातिमा सना शेख दिसणार आहेत. या अँथॉलॉजी सीरिजमधून प्रेमातील संघर्ष आणि त्यांचे सुंदर पैलू दाखवले जाणार आहेत. सीरिजमध्ये सहा एपिसोड असतील. डिसेंबरमध्ये या सीरिजचे शूटिंग सुरू झाल्याचे समजते. लवकरच ही सीरिज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रीलिज होणार आहे.