Bhandara Zilha Parishad Election result : भंडाऱ्यात मतदारांनी दिला त्रिशंकू कौल | पुढारी

Bhandara Zilha Parishad Election result : भंडाऱ्यात मतदारांनी दिला त्रिशंकू कौल

भंडारा; वृत्तसेवा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा ( Bhandara Zilha Parishad Election result ) निकाल आज जाहीर झाला. जिल्हा परिषदेत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी बहुमतासह सत्ता स्थापनेचा दावा केला होता. परंतु, निकालाअंती कोणत्याही पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. मतदारांनी त्रिशंकू कौल दिला आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी आघाडी, युतीसह निवडून आलेल्या सदस्यांची पळवापळवी करावी लागणार आहे.

५२ जिल्हा परिषद सदस्य संख्या असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ( Bhandara Zilha Parishad Election result  ) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यासह बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष स्वतंत्रपणे लढले. काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीपासूनच स्वतंत्र लढण्याचा नारा होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीसाठी पुढाकार होता. परंतु, अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊ शकली नाही. सर्वच प्रमुख स्वतंत्र लढले. दोन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात होता. परंतु, आज जाहीर झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.

भंडारा तालुक्यातील १० जागांपैकी काँग्रेसला तीन जागा जिंकता आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाजप १ तर १ अपक्ष उमेदवार जिंकून आले आहेत. भंडारा तालुक्यातील गणेशपूर क्षेत्राची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. चौरंगी लढत असलेल्या क्षेत्रात अखेर राष्ट्रवादीचे यशवंत सोनकुसरे विजयी झाले. भाजप, काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला. ( Bhandara Zilha Parishad Election result  )

तुमसर तालुक्यातील १० जागांपैकी ४ जागांवर भाजपचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले. मोहाडी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. या तालुक्यातील ७ जागांपैकी ५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. तर प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस आणि भाजपाला समाधान मानावे लागले. ( Bhandara Zilha Parishad Election result  )

साकोली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. या तालुक्यातील ६ जागांपैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकली नाही. काँग्रेसचे ३, भाजपचे २ तर एक अपक्ष उमेदवार निवडून आले. या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा जम असताना मतदारांनी राष्ट्रवादीला का डावलले? याचे मंथन आता नेत्यांना करावे लागणार आहे.

लाखनी तालुक्यातील ६ जागांपैकी काँग्रेसने ४ जागांवर मिळविला. भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. या तालुक्यातील मुरमाडी / तुप क्षेत्राची निवडणूक लक्षवेधी ठरली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतांची विभागणी झाल्याने भाजप उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

पवनी तालुक्यातील ७ जागांपैकी काँग्रेसला ५ जागांवर विजय मिळाला. ब्रम्ही क्षेत्रातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई हे निवडून आले. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला एका जागेवर विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडला आला नाही.

लाखांदूर तालुक्यात एकूण ६ जागांपैकी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी २ जागा मिळाल्या. बहुजन समाज पक्षाने आपला खाते उघडून मासळ या क्षेत्रातून विजय मिळविला. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले.

Back to top button