Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात ५ नगरपंचायतींवर पालकमंत्री विजय वड्डेटीवारांचे वर्चस्व | पुढारी

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात ५ नगरपंचायतींवर पालकमंत्री विजय वड्डेटीवारांचे वर्चस्व

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींत झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने ३ नगरपंचायतींवर एकहाती सत्ता मिळविली आहे. तर २ नगर पंचायतीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपला पोंभुर्णा या एकाच नगरपंचायतीवर विजय मिळविता आला. (Chandrapur)

चंद्रपूर जिल्ह्यात ५ नगरपंचायतींवर पालकमंत्री विजय वड्डेटीवारांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर एकाच ठिकाणी मुनगंटीवारांना सत्ता  राखण्यास यश आले आहे.

सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीच्या एकूण १०२ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक ५३ जागा मिळाला तर भाजपला २४ जागांवरच थांबावे लागले. राष्ट्रवादी कॉग्रेसला ८, शिवसेना ४, अपक्ष ३ आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागा व शेतकरी संघटना तसेच बहुजन वंचित आघाडीला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे.

सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीच्या एकूण १०२ जागांसाठी सर्वप्रथम आरक्षित जागा आणि त्यांतर काल (दि.१८) मंगळवारी अनारक्षित जागांसाठी निवडणुका पार पडल्या.

Chandrapur : अडीच वर्षांत सत्तापालट

आज (दि.१९) बुधवारी मेतमोजणी पार पडली. यामध्ये सिंदेवाही नगरपंचायत : काँग्रेस -१३, भाजप ३, अपक्षाला १ जागेवर विजय मिळविता आला. मागील वेळी येथे भाजपने सत्ता प्रस्थापित केली होती. अडीच वर्षाची सत्ता उपभोगल्यानंतर भाजपचे तीन ते चार सदस्य फोडून उर्वरित कालावधीत काँग्रेसने आपली सत्ता स्थापन केली होती.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा विधानसभा क्षेत्र असलेल्या सिंदेवाही नगरपंचायतींमध्ये यावेळेस काँग्रेसने निर्विवाद सत्ता मिळविली आहे. सावली येथे काँग्रेसने १४ तर भाजपला फक्त ३ तीन जागांवर विजय मिळविता आला. काँग्रेसला एकहाती सत्ता प्रस्थापित करता आली आहे. पालकमंत्री विजय वड्डेटीवारांचे हे विधानसभा क्षेत्र असून त्यांनी आपला गड कायम राखला आहे.

यापूर्वी सावली मध्ये काँग्रेसची सत्ता होती. मागील वेळी काँग्रेसला १० जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागांवर विजय मिळविता आला होता. मात्र संदीप गड्डमवार हे वडेट्टीवार यांच्या खेम्यात गेल्याने गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागांचे नुकसान झाले आहे. तर काँग्रेसच्या ४ जागा वाढून यावेळी १४ जागांवर विजय खेचून आणण्यात यश आले आहे.

भाजपने आपला गड कायम राखला

पोंभुर्णा येथे मागील प्रमाणे यावेळी भाजपने आपला गड कायम राखला आहे. यावेळी भाजपला १० तर शिवसेना ४, वंचित २, काँग्रेसला १ जागा मिळवता आली आहे. पोंभूर्णा हे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभा क्षेत्र आहे. त्यांना आपला गड कायम राखण्यासाठी यश आले आहे.

गोंडपिपरी येथे काँग्रेसला ७ तर  भाजप ४, शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २, अपक्षांच्या वाट्याला २ जागा आल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपाला ६ जागा तर अपक्ष ७,  शिवसेना १ व काँग्रेस ३ जागेवर निवडून आलेला होता. भाजपने अपक्षांना सोबतीला घेऊन सत्ता प्रस्थापित केली होती.

अडीच वर्षाची सत्ता भोगल्यानंतर अपक्ष उमेदवारांपैकी ३ उमेदवार काँग्रेसला जावून मिळाल्याने उर्वरीत अडीच वर्षाची काँग्रेसने उपभोगली होती. यावेळी काँग्रेसला ४ जागांचा फायदा झाला असून भजपाला २ जागांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांनी खाते खोलता आले आहे. (Chandrapur)

कोरपना : काँगेस १२, भाजप ४, शेतकरी संघटना १ तर  जिवतीमध्ये काँग्रेस ६, राष्ट्रवादी काँग्रेस ६, गोंडवाणा गणतंत्र पार्टीला ५ जागांवर विजय मिळविता आला.

Back to top button