

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नालेसफाई ७० टक्के पूर्ण झाल्याचा ठाणे महापालिकेचा दावा खोटा ठरला असून आज भाजपने केलेल्या नाले पाहणी दौऱ्यात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची हाथ की सफाई उघडी पडली.
आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील नाले सफाईची पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि पदाधिकारी उपस्थित होते. माजिवडे येथील नाला कचऱ्याने तुंबला असून पावसाळा तोंडावर असतानाही या नाल्याची सफाई झाली नसल्याचे आढळून आले.
ठाणे महापालिकेने नालेसफाईसाठी १० कोटींचा निधी दिला असून सध्याची नाले सफाई पाहता ठाणेकरांच्या या पैशांची खुलेआम लूट होत असल्याचा आरोप आ. केळकर यांनी यावेळी केला. एकीकडे आयुक्त अभिजित बांगर प्रयत्न करत असले तरी ठेकेदार आणि अधिकारी त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असल्याचा आरोपही केळकर यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेने नाले सफाईच्या तक्रारींबाबत हेल्पलाईन जारी केली आहे. नागरीकांनी पुढाकार घेऊन याबाबत तक्रारी कराव्यात, अन्यथा पावसाळ्यात मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भ्रष्टाचाराचे नमुने आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असेही केळकर यांनी सांगितले.
हेही वाचा :