डोंबिवलीत भरदुपारी दोन महिलांना ३ लाखांना लूटले

डोंबिवलीत भरदुपारी दोन महिलांना ३ लाखांना लूटले
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : दुपारच्या वेळेत शहर वाहतूक पोलिस सार्वजनिक चौक आणि रस्त्यांवर फारसे फिरकत नसल्याने आणि त्याच वेळेत रस्त्यांवर सामसूम असल्याचा गैरफायदा लुटारू दुचाकीस्वार व बदमाश रिक्षावाल्यांनी घेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी दुपारी कल्याण-शिळ मार्गावरील दावडी आणि डोंबिवलीतील चार रस्त्यावर दोन वेगळ्या घटनांमध्ये दुचाकीवरील लुटारूंनी २ लाख ९४ हजार रुपयांची लूट केली.

डोंबिवली पूर्वेकडील चार रस्त्यावर असलेल्या रंगोली हाटेलजवळ विमल सोरटे ( वय ७५, रा. स्टार कॉलनी, मानपाडा रोड, डोंबिवली-पूर्व) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तर दावडी येथे राहणाऱ्या शुभांगी शिंदे ( वय ३९) यांच्याजवळील २ लाख १४ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लुटून पोबारा केला. टिळकनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विमल सोरटे या गुरुवारी दुपारी मानपाडा रस्त्याने घरी जात होत्या. रंगोली हॉटेलजवळ त्यांना दोन अज्ञात व्यक्ती भेटले. त्यांनी विमल यांना आपण तुम्हाला ओळखतो. गळ्यात सोन्याची माळ ठेऊ नका, हल्ली चोरीचे प्रकार वाढले आहेत, असे बोलून विमल यांच्या गळ्यातील सोन्याची माळ काढली आणि यानंतर माळ एका कापडी पिशवीत गुंडाळून हातचलाखीने सोन्याची माळ असलेली पिशवी स्वत:कडे ठेवली आणि रिकामी कापडाची पिशवी विमल यांच्या हातात दिली. यानंतर आम्ही चहा पिण्यास जातो, असे बोलून व्यक्ती घटनास्थळावरुन पसार झाले. विमल यांनी कापडी पिशवी उघडली असता त्यांना त्यात काही आढळून आले नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर विमल यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

कल्याण-शिळ मार्गावरील दावडी गावात राहणाऱ्या शुभांगी शिंदे यांनी एचडीएफसी बँकेतून २ लाख १४ हजार रुपयांची रक्कम काढली होती. त्यांच्याजवळ चार हजार रुपयांची रक्कम होती. पैशांची पिशवी जवळ ठेऊन त्या घरी जाण्यासाठी शिळ रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. इतक्यात दुचाकीवरुन दोघेजण शुभांगी यांच्या दिशेने आले. काही कळण्याच्या आत शुभांगी यांच्या हातामधील पैशाची पिशवी हिसकावून लुटारूंनी पळ काढला. शुभांगी यांनी ओरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोरटे लांब निघून गेले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात शुभांगी यांनी तक्रार दाखल केली आहे.

वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य

डोंबिवली पूर्वेकडील संत नामदेव पथला सुविधा सोसायटीत राहणाऱ्या वनिता कुडतडकर ( वय ६५) या शेजारी राहणाऱ्या महिलेसह भाजी खरेदी करून चालल्या होत्या. रॉकेल डेपोच्या गल्लीत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वनिता यांच्या गळ्यातील चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. वनिता यांनी त्यांना जोरदार प्रतिबंध केल्याने सदर चेनचा काही भाग तुटला. या लुटारूंनी वनिता यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किंमतीची चेन खेचून पोबारा केला.

दुसऱ्या घटनेत रामनगरमधील श्रीस्नेह सोसायटीत राहणाऱ्या सुजाता श्रीनिवास जिनराळ (वय ५२) या टाटा पॉवर लाईनखालून रात्री नऊच्या सुमारास पतीसह जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी सुजाता यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून धूम ठोकली.

तिसऱ्या घटनेत टिळकनगरमधील ध्वनी सोसायटीत राहणारे अशोक हरिभाऊ खिलारी (वय ५९) हे मानव कल्याण केंद्राच्या गल्लीतून जात होते. एका अनोळखी रिक्षावाल्याने हटकून चला तुम्हाला घरी सोडतो, बरेच दिवस भेटले नाहीत, काय तुम्ही, मला पार्टी पण दिली नाही, अशा बोलण्याच्या नादात भुरळ घालून सदर रिक्षावाल्याने अशोक यांच्या पिशवीतून १० हजारांची रोकड गुपचूप काढून पलायन केले. या तिन्ही घटनांप्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news