नवरात्रोत्सव : भगूरचे रेणुकामाता मंदिर सज्ज; सीसीटीव्हीची राहणार नजर | पुढारी

नवरात्रोत्सव : भगूरचे रेणुकामाता मंदिर सज्ज; सीसीटीव्हीची राहणार नजर

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेस्टकॅम्प रोडवरील रेणुकामाता मंदिरातील रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात असून, पहिल्या माळेआधीच भाविकांसाठी मंदिर सज्ज होणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे पुजारी वंदन चिगरे यांनी दिली.

कोरोनामुळे दोन वर्षांनंतर यंदा देवीची यात्रा भरत असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच मंडप उभारणीचे काम सुरू असून, महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. नऊ दिवस घटी बसणाऱ्या महिलांसाठी मंदिराच्या मागील सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात मंदिर पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त राहणार असून, भुरट्या चोऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. मात्र, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि मोबाइल सांभाळावेत, असे आवाहन पुजारी वंदन चिगरे यांनी केले आहे.

भगूरचे रहस्य असे :

* पुरातन काळी येथे भृगूऋषी तपासाठी या परिसरात वास्तव्यास असल्याने भृगूऋषींच्या नावावरून या गावाला भगूर हे नाव पडले आहे.

* येथील रेणुकामातेचे मंदिर देवळाली कॅम्पच्या रेस्टकॅम्प रोडवर असले तरी हे मंदिर ‘भगूरची रेणुकादेवी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

* या मंदिराच्या समोर एक प्राचीन बारव आहे. या बारवेतील पाण्यात हातपाय धुतल्यास त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची धारणा आहे.

* नवसाला पावणारी देवी म्हणूनही ख्याती असलेल्या या रेणुका मंदिरात दर मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी होत असते.

भगूर बारव www.pudhari.news
देवळाली कॅम्प : बारवेची स्वच्छता करताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य कर्मचारी.

प्रसिद्ध बारवेची सफाई :

कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागाच्या वतीने मंदिरासमोरील बारवेची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील गाजरगवत काढून घेण्यात आले आहे. तसेच, दहा दिवस चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button