Ganesh Chaturthi : एक गाव एक गणपती; ५७ वर्षांपासून संदप गावाचा सामाजिक एकोप्याचा संदेश

Ganesh Chaturthi : एक गाव एक गणपती; ५७ वर्षांपासून संदप गावाचा सामाजिक एकोप्याचा संदेश

गणेशोत्सव म्हटले की, जिथे नजर जाईल तिथे बाप्पांचे दर्शन घडते. मग गावांत असो, खेड्या-पाड्यांत असो किंवा शहरी भागातील गल्लोगल्ली असो. जिथे-तिथे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. मात्र एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितच ठिकाणी दिसून येते. (Ganesh Chaturthi)

अशाच एक गाव एक गणपतीच्या संकल्पनेतून सार्वजनिक एकता आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी संकल्पना डोंबिवली जवळच्या संदप या गावात गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. सुशिक्षितांच्या या सुसंस्कृत गावात गणेशोत्सवाचे ५७ वे वर्ष असून यंदा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.

कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या मानपाडेश्वर मंदिराजवळून भोपरमार्गे दिव्याकडे जाणाऱ्या रस्त्याला संदप गाव आहे. जवळपास १५० उंबरे अर्थात घरे असलेल्या या गावात श्री दत्ताचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा बालयोगी सदानंद महाराजांच्या हस्ते रविवारी ९ फेब्रुवारी १९९७ रोजी करण्यात आला.

याच मंदिरात श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायांची मूर्ती स्थापन करण्यात येते. तर अनंत चतुर्दशी दिनी गणरायाच्या मूर्तीचे वाजतगाजत विसर्जन करण्यात येते. गावात गेल्या ५७ वर्षांपासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

शिक्षक बबन पाटील यांची संकल्पना

त्या काळात या गावामध्ये सातवीपर्यंत शाळा होती. संदपसह उसरघर, भोपर, नांदिवली, देसले पाडा, आगासन, दातिवली आदी पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षण घेत असत. या शाळेत बबन पाटील हे शिक्षक होते. त्यांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना ग्रामस्थांसमोर ठेवली.

या संकल्पनेमुळे सामाजिक एकोपा आणि सार्वजनिक स्वास्थ्य टिकून राहू शकते हा त्या मागचा उद्देश शिक्षक पाटील यांनी ग्रामस्थांना पटवून दिला. त्यावेळीचे पोलीस पाटील कृष्णा पाटील, बालाजी पाटील, आदी कर्त्या मंडळींसह ग्रामस्थांनी या संकल्पनेला चालना दिली. तेव्हापासून या गावातल्या कोणत्याही घरात गणपती बसविला जात नाही. गावातील दत्त मंदिरात श्री गणेशाची स्थापना करण्यात येते. गावातले तरूण एकत्र येऊन बाप्पांसाठी आसनव्यवस्था आणि आरास तयार करतात. इथे बनविण्यात येणारी आरास इको फ्रेंडली असते.

सासुरवाशीनींची आवर्जून उपस्थितीती

दहा दिवसांच्या कालावधीत रोज आरती, हरिपाठ, भजनाच्या कार्यक्रमांनी गावात भावभक्तीचा मळा फुलला जातो. बाप्पाच्या आगमनादिवशी भंडारा अर्थात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गणेशभक्त भाविकांसह सासरी गेलेल्या लेकीही आपल्या माहेरी गावात बसविलेल्या बाप्पाच्या दर्शनाला आवर्जून उपस्थित राहतात. (Ganesh Chaturthi)

विशेष म्हणजे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता कुणाकडूनही देणगी वा वर्गणी स्वीकारली जात नाही. तसेच गावातील कुणाकडेही मागण्याची गरज पडत नाही. प्रत्येकजण स्वतःहून पुढे येऊन मदत करतो, असे मंडळाचे अनंता पाटील यांनी सांगितले. या माध्यमातूनच आमच्या गावाने समाजाला एकतेचा सामाजिक संदेश देण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

भजनांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बाऱ्या

या गावात वैयक्तिक अशा घरगुती गणरायाची स्थापना केली जात नाही. मात्र कुणाचा नवसाचा गणपती असेल तर माघ महिन्यात ते आपल्या घरी बसवतात. अत्यंत कडक शिस्तीच्या या गावात जुगारबंदी लागू असल्याचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितले. तर विसर्जनाच्या आदल्यादिवशी जागरण असते. या जागरणाला दोन संगीत भजनांच्या बाऱ्या केल्या जातात. त्यामुळे उत्सवादरम्यान गावातील वातावरण गणरायाच्या भक्तीत फुलून गेलेले असते, असे सेक्रेटरी अभिमन्यू पाटील म्हणाले.

असे आहे गावकीचे मंडळ

श्री गुरूदत्त मंदिर ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष मधुकर पाटील, सेक्रेटरी अभिमन्यू पाटील, अनंता पाटील, प्रवीण पाटील, आदी मंडळी कारभार पाहतात. दरवर्षी गणेशोत्सवात तरुण-तरुणी, जेष्ठ ग्रामस्थ आणि महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग दिसून येतो. गावकीच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लहान-थोरांचा उत्सवाच्या कार्यात हातभार लागत असतो. त्यातून गावातील एकोपा दिसून येतो. (Ganesh Chaturthi)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news