महाड : श्रीकृष्ण बाळ, इलियास ढोकले
गेल्या तीन वर्षांपासून किल्ले रायगडावर सुरू असलेल्या राजवाड्यांचा उत्खननासंदर्भात धोरणात्मक निर्णय म्हणून केंद्रीय पुरातत्त्व खात्याने रायगड प्राधिकरणाला परवानगी दिल्याची माहिती किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरील भेटीदरम्यान दिली. दोन्ही संस्था संयुक्तरित्या रायगडावरील तीनशेपेक्षा जास्त वास्तूंचे जतन, संवर्धन करण्याचे काम करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड प्राधिकरणाच्या कामासंदर्भात स्थानिक आमदार व नागरिकांनी केलेल्या आरोपासंदर्भात पत्रकारांसह खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी दिवसभर किल्ले रायगडावर सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. रायगड रोप वेने सकाळी दहा वाजता रायगडावर पोहोचल्यानंतर त्यांनी किल्ल्यावरील कामे आणि रोप वे संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. दक्षिण भारतात तसेच परदेशांत व गिरनार येथे असलेल्या रोप वे प्रमाणे स्टेट ऑफ आर्ट दर्जानुसार येथील रोप वेची निर्मिती व्हावी, असा आग्रह आहे. यासाठी प्राधिकरणाच्या डीपीआरमध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली.
तीन वर्षांपासून किल्ले रायगडावर केंद्रीय पुरातत्त्व विभागामार्फत राजवाड्यांचे उत्खनन, जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. मात्र कामाची प्रगती लक्षात घेता प्राधिकरणाचे काम करण्यास परवानगी द्यावी, या मागणीला केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्याने आता गडावरील सुमारे तीनशेपेक्षा जास्त इमारतींचे जतन, संवर्धन व उत्खनन करण्याचे काम संयुक्तरित्या करण्यास सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
1974 साली होळीच्या माळावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामासंदर्भात बोलताना हे कामही ऐतिहासिक पद्धतीने केले जाईल. पुतळ्यावर पंचधातूचे छत्र निर्माण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. किल्ल्यावरून येणारे पावसाचे पाणी हिरकणी वाडी व परिसरातील ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरले आहे. यासंदर्भात आवश्यक प्रयत्न करू, असे स्पष्ट केले.
नियमानुसार सर्व किल्ल्यांवर सायंकाळी सहानंतर राहण्यास बंदी आहे, हे लक्षात घेऊन किल्ल्यावर सध्या शिवभक्तांना रात्रीच्या वेळेस प्रवेश देण्यास मज्जाव केला जातो. याबाबत विचारले असता त्यांनी किल्ल्यावर येणारे शिवभक्त येथे छत्रपतींचा आचार, विचार व आत्मचिंतन करण्यासाठी येतात, असे सांगून गनिमी काव्याने यासंदर्भात शासनाकडून परवानगी मिळवू, असा विश्वास व्यक्त केला.