

ठाणे : घरेलू कामगार पुरविणाऱ्या विविध कंपन्यांच्या ॲपचे पेव फुटले आहे. कामगार पुरविणाऱ्या या कंपन्यांच्या मार्फत कामे मिळविणाऱ्या महिला कामगारांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसले तरी महिला ॲपच्या मार्फत कामे मिळवत आहेत. मात्र या कंपन्या केवळ 18 ते 40 वयोगटातील महिलांना काम देत असल्याने अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये या महिलांना कामाला बोलवण्यास प्रारंभ केले जात असल्याने नियमित काम करणाऱ्या मध्यम वयीन तसेच ज्येष्ठ महिला कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे.
घरेलू कामगार संघटनांच्या आकडेवारी नुसार राज्यात सध्या 30 लाखाच्या घरात महिला घरेलू कामगार आहेत,त्यातील 7 ते 8 लाखाच्या घरात महिला मुंबई महानगर प्रदेशात कार्यरत आहेत. या कामगारांमध्ये पन्नाशी आणि साठी उलटलेल्या सुमारे 60 टक्के महिला आहेत. ॲपबेस कंपन्यांच्या कामाचा विस्तार झाला तर या ज्येष्ठ कामगार महिलांचा रोजगार अधिकच हिरावला जाईल.
राज्य सरकारने घरेलू कामगार महिलांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाची स्थापना केली असली तरी या घरेलू कामगार महिलांच्या कामाचे दर निश्चित नाहीत, त्यामुळे महानगरे सोडली तर या महिला कामगारांना तुटपुंज्या वेतनात काम करावे लागते. या महिलांच्या रोजगाराच्या अस्थिरतेच्या वातावरणात आता विविध खासगी कंपन्यांनी घरेलू कामगार पुरविणाऱ्या ॲपची निर्मिती केली आहे.
या कामगार पुरविणाऱ्या कंपन्यांमार्फत कोणत्या प्रकारचे काम, किती दिवस किंवा किती तास असेल याची माहिती ॲपवर मिळते. मात्र या कंपन्या काम देतांना 18 ते 40 वयोगटातील महिलांना प्राधान्यदेत असल्याने पन्नाशीच्या व साठीच्या घरातील किंवा त्यावरील वयोगटातील महिलांच्या हाताला काम मिळत नाही.मालकांना ॲपद्वारे घरकामाला कामगार उपलब्ध होत असल्याने क्षुल्लक कारणावरून या महिलांना कामावरून कढले जाईल,अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.
राज्यात घरेलू कामगार कल्याण मंडळ 2015 पर्यंत अस्तित्वात होते,त्यानुसार राज्यात सुमारे 30 लाखाच्या घरात घरेलू कामगार होत्या, ही सरकारचीच आकडेवारी आहे. आता तर या संख्येत आणखी भर पडली असणार, त्यातील सुमारे 7 ते 8 लाख महिला या मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरात आहेत. सर्वोच्य न्यायालयाने एका सुनावणीत केलेल्या टिप्पणीनुसार देशात सुमारे 2 ते 3 कोटीच्या घरात ही संख्या आहे. महिला घरेलू कामगारांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या सध्या नोंदणी शुल्क आकारत नाहीत, मात्र त्या 1 तासाचे महिलेला कामाचे 70 ते 80 रूपये देतात. घरापासून 10 ते 15 मिनिटात पोहचता येईल, असे काम मिळते. परंतू हे काम देतांना कंपन्या 25 ते 45 वयोगटातील महिलांना कामे देतात, मात्र त्यावरील महिलांची नोंदणी केली जात नाही. या कामात प्रामुख्याने भांडी, कपडे आणि लादी पुसणे ही कामे असतात. राज्यातील घरेलू कामगार महिलांमध्ये सुमारे 60टक्के महिला या पन्नाशी आणि साठी ओलांडलेल्या आहेत.या कंपन्यांचा विस्तार झाल्यास या महिलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे,त्यामुळे या कंपन्यांवर सर्वच बाबतीत कायदेशीर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
उदय भट, सर्व श्रमिक संघटना
घरातील पतीचे काम सुटल्यावर किंवा पतीचा रोजगार अत्यंत कमी आहे, अशा महिला 25 किंवा तिशीनंतर घरकाम करण्यास सुरवात करतात. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि मिळणारा मोबदला याबाबत कसलाच कायदा किंवा नियम नसल्याने हजारो महिला तुटपुंज्या पगारावर राबतात. त्यात या कंपन्या 18 ते 40 वयोगटातील महिलांना कामावर बोलवतात त्यामुळे आजही हजारो परित्यक्ता, विधवा महिला केवळ आधार नसल्याने पन्नाशीनंतर किंवा साठीनंतरही कुटुंबासाठी राबतात, त्यांच्या रोजगारावर या कंपन्यांमुळे गदा आलीच आहे. शिवाय या कंपन्यांमार्फत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी काय, मोबदल्याचे दर काय याबाबत कोणतीही खात्री नाही, त्यामुळे या ॲपमार्फत रोजगार देणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर नियंत्रण आणावे, अशी आमची मागणी आहे.
रेखा जाधव, ठाणे जिल्हा समन्वयक ः राष्ट्रीय घरकामगार चळवळ