मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू सोबत एकत्रित निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निवडून आलेल्या एकमेव नगरसेवकांनीही शिवसेनेला म्हणजेच पर्यायाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसने महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची साथ सोडली तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांने एकत्रित निवडणूक लढवली. यात शिवसेना (उबाठा) यांचे 65 नगरसेवक निवडून आले. तर मनसेची 6 व शरद पवार गटाचा एकमेव नगरसेवक निवडून आला. त्यामुळे पालिकेत विकास आघाडीच्या नगरसेवकांची संख्या 72 झाली होती.
त्याशिवाय विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे 24 व एमआयएम 8 व समाजवादी पार्टीचे 2 नगरसेवक आहेत. त्यामुळे विरोधकांच्या नगरसेवकांची संख्या 106 झाली आहे. तर सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेस धरून 121 झाली आहे. पण ऐन महापौर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.
रावराणे यांच्या पाठिंबामुळे महायुतीच्या नगरसेवकांचे संख्याबळ 222 झाले आहे. रावराणे यांनी दिलेल्या पाठिंबामुळे त्यांना वैधानिक समित्यांच्या सदस्य पदी देण्यात येणार असल्याचे समजते. त्याशिवाय अतिरिक्त निधीही उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले आहे. आपण शिवसेनेला पाठिंबा दिला असून केवळ विभागाच्या विकासासाठी हा निर्णय घ्यावा लागला मात्र आपण कायम शरद पवार गटाचे नगरसेवक असणार असल्याचे अजित रावराणे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना स्पष्ट केले.