

ठाणे : विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचा देखील समावेश असून विदीप जाधव हे कळव्यातील विटावा परिसराचे रहिवासी होते. बुधवारी पहाटे त्यांनी मुंबईला जाण्यासाठी घर सोडले. प्लेनमध्ये बसल्यावर त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचा त्यांचा फोटो आपल्या पत्नीला पाठवला. मात्र त्यांनी पाठवलेला हा फोटो त्यांचा अखेरचा फोटो असेल, अशी कल्पना देखील कोणाला नसेल. पहाटे कामाला जाण्यासाठी निघालेल्या विदीप जाधव यांची चार तासांनी मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि कुटुंबीयांवर मोठा आघातच झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यापैकीच एक म्हणजे अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव. विदीप जाधव हे गेल्या 20 ते 22 वर्षांपासून कळव्यातील विटावा परिसरातील सूर्यनगर, कृष्णविहार या इमारतीमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, आई, वडील तसेच 9 वर्षाचा एक मुलगा आणि 13 वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे.
बुधवारी पहाटे 5 वाजता त्यांनी मुंबईला जाण्यासाठी घर सोडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ते प्लेनमधून बसून बारामतीसाठी रवाना झाले. प्लेनमध्ये बसल्यानंतर अजित पवार यांच्यासोबतचा त्यांचा फोटो त्यांनी त्यांच्या पत्नीला पाठवला. मात्र त्यांनी पाठवलेला हा फोटो त्यांचा अखेरचा फोटो ठरला. अवघ्या चार तासांतच अजित पवार आणि त्यांच्या बरोबर विमानात प्रवास करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली.
बातमी कळताच विदीप जाधव यांच्या आईने टाहो फोडला. मात्र शेजारी त्यांना धीर देण्याचे काम करत होते. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना गावी घेऊन जाण्यासाठी वाहन आले आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने त्यांचा सातारा येथील फलटण या गावी घेऊन जाण्यात आले.
विदीप जाधव हे 2009 ला नायगाव या ठिकाणी पोलीस दलात सामील झाले. नंतर ते विटावा परिसरात राहायला आले. जाधव हे अजित पवार यांचे सुरक्षारक्षक असल्याची कल्पनाही ते जेथे राहत होते तेथील रहिवाशांना नव्हती. शेजारील विद्या साने यांनी एकदा अजित पवार यांच्या- सोबत त्यांना टीव्हीवर बघितल्यानंतर हे अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक असल्याचे समजले. त्यांच्या मृत्यूमुळे विटावा परिसरातही शोककळा पसरली आहे.