

मुंबई : 26 जानेवारीला सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे लोकांनी पर्यटनस्थळांना मोठ्या प्रमाणात भेटी देत सुट्टीचा आनंद लुटला. सर्वात जवळचे पर्यटन स्थळ म्हणून मुंबईकरांनी अलिबाग येथे जाण्यासाठी ट्रेन, एसटी बस खासगी वाहन चालवत जाण्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून रो रो बोटीने जाण्याचा मार्ग अवलंबला. मात्र, सुट्टी आणि सणावाराच्या दिवशी रो रो चे तिकीट दर अचानक 200 ते 300 रुपयांनी वाढवून प्रवाशांची लूट केली जात आहे.
अलिबागला जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडियावरून असंख्य बोटी येजा करत असतात. त्याचप्रमाणे भाऊचा धक्कावरून अलिबागला जाण्यासाठी खास रो रो बोटींचा लोक वापर करत. परंतु सुट्टी आणि सणावाराच्या दिवशी रो रो बोटीच्या तिकिटांचे दर कायम बदलत राहतात. ऑनलाइन वेबसाईटवर तीन प्रकारचे पर्याय दिले जातात. एरवी साधारण तिकीटाचे दर 400 रुपये, तर एसी डेकचे दर किमान 470 रुपयांपासून सुरू होतात. तर लाउंज डेकच्या तिकिटांचे दर 1500 रुपयांपासून सुरू होतात. परंतु हेच दर सुट्टी आणि सणावाराच्या दिवशी 200 ते 300 रुपयांनी वाढवले जातात.
एका रांगेत सुट्ट्या किंवा सणवार आल्यावर रो रो चालक प्रवाशांकडून जादा पैसे आकारतात. तसेच कामधंद्यात व्यस्त असणारी लोक जास्त करून ऑनलाईन तिकीट बुक करून प्रवास करतात. यातही आठवडाभराचे आणि शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या दिवसांचे दर नेहमीपेक्षा जास्त आकारले जातात. काहींना चुकीच्या पद्धतीने तिकीट बुक केल्याचे खोटे कारण सांगून दुसरी तिकीटे तत्काळ काढायला लावून कर्मचारीवर्ग जेटीवरच पुन्हा भुर्दंड भरायला लावतात. घाई गडबडीत असणाऱ्या प्रवाशांकडे एकदा जेेट्टीवर पोहोचल्यावर मागे फिरण्याचा दुसरा पर्याय उरलेला नसतो. त्यामुळे अनेकांना दुबार तिकिटे काढून जास्तीचे पैसे मोजावे लागतात. ही सर्व शक्कल जेट्टीवर उपस्थित कर्मचारी लिलया रचत असतात.
गिरगावातल्या एक जोडप्याने 26 जानेवारीला सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे ऑनलाईन तिकीट काढून अलिबागला जाण्याचा विचार केला होता. त्यावेळी त्यांना 23, 24, 25 जानेवारीला रो रो फेरी बोटींच्या तिकिटांचे वेगवेगळे दर दिसून आले. त्यांनी अलिबागला जाण्यासाठी 23 तारखेला सायं 5:40 च्या रो रोची 400 रुपयांची दोन तिकीटे बुक केली होती. परत येण्यासाठी 26 जानेवारीला त्याच दरात तिकीटे काढली. परंतु 26 जानेवारीला अलिबाग मांडवा जेट्टीवर पोहोचल्यावर त्यांना रो रो कर्मचाऱ्यांकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली. तिथे हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तुम्ही मांडवा ते भाऊचा धक्का नाही, तर मुंबई-मांडवा तिकीट ऑनलाईन दोनदा काढल्याचे सांगितले. बॉसबरोबर बोलून तुमच्या दुसऱ्या तिकीटाचा बंदोबस्त करतो असे सांगून अधिकचे अकराशे रुपये वसुल केले. रात्र होत असल्याने आणि मांडवा जेट्टीवरून घर लांब असल्याने अकराशे रुपये भरून ते मुंबईला परतले. त्यावेळी मांडवा जेट्टीवर अनेकांना चुकीचे तिकीट काढल्याचे सांगून अडवणूक करून रो रो कर्मचारी लुटत असल्याचे त्यांनी पाहिले.
तिकिटांबरोबर रो रो मध्ये चहा-नाश्त्याचे दरही गगनाला भिडलेले आहेत. केवळ चहा पिण्यासाठी 120-150 रुपये, तर साधे ब्रेड बटर खाण्यासाठी 180 रुपये मोजावे लागतात
रो रो बोटीचे कामकाज जास्त करून केंद्राच्या हातात आहे. एम 2 एम कंपनीला रो रो फेरी बोटीचा ठेका देण्यात आला आहे. त्यांना परवडणारे दरही ठरवून दिलेले आहेत. पण तिकिटांचे ज्यादा दर आकारले जात असतील आणि प्रवाशांची फसवणूक केली जात असेल तर त्याबाबत माहिती घेऊ.
कॅप्टन प्रमोद पी किनी, सहाय्यक आयुक्त (पतन), मुंबई पोर्ट ट्रस्ट