PhD : अंबरनाथमधील प्राध्यापक सुरेश मढवी यांची आगरी समाजावर पीएचडी; सर्वत्र कौतुक

PhD : अंबरनाथमधील प्राध्यापक सुरेश मढवी यांची आगरी समाजावर पीएचडी; सर्वत्र कौतुक
Published on
Updated on

ठाणे, पुढारी ऑनलाईन : अंबरनाथ तालुक्यातल्या एका प्राध्यापकांनी 'आगरी समाज' या विषयावर पीएचडी (PhD) मिळवली. यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. मनसे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र असलेल्या या प्राध्यापकांच्या कौतुकासाठी स्वतः राजू पाटील यांच्यासह अनेक वर्गमित्रही उपस्थित राहिले. सुरेश तुकाराम मढवी असं या प्राध्यापकांचं नाव असून ते अंबरनाथ तालुक्यातल्या उंबार्ली गावात राहतात.

गेल्या २३ वर्षांपासून मढवी हे कल्याणच्या के. एम. अगरवाल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. स्वतः आगरी समाजात जन्मलेल्या सुरेश मढवी यांनी २०१४ सालापासून आगरी समाजाचा अभ्यास सुरू केला. यानंतर 'ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास' या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली.

आगरी समाजात शिक्षणाची सुरुवात १९६० पासून झाली, त्यामुळे त्यापूर्वीचे कोणतेही लेखी संदर्भ उपलब्ध नसताना गावोगाव फिरून माहिती गोळा करत सुरेश मढवी यांनी या विषयाचा अभ्यास केला. आगरी कोळी समाज आद्यनिवासी असूनही विकासापासून वंचित असून आगरी समाजाचा परिचय इतर समाजांना व्हावा, या हेतूनं आपण हा विषय निवडल्याचं सुरेश मढवी यांनी सांगितलं.

दरम्यान, सुरेश मढवी यांची पीएचडी पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातल्या ग्रामस्थांना मोठा आनंद झाला आहे. आज सुरेश मढवी यांचं उंबार्ली गावात जंगी स्वागत करण्यात आलं. सुरेश मढवी हे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे राजू पाटील हे सुद्धा यावेळी मित्राचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. राजू पाटील यांच्यासह सर्व वर्गमित्रांनी मिळून सुरेश मढवी यांचं स्वागत केलं. आपल्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं ग्रामस्थ आणि वर्गमित्रांनी सांगितलं.

आगरी समाज हा मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर इतकंच नव्हे तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही वास्तव्याला आहे. मात्र दर १० किलोमीटरवर समाजाच्या प्रथा, परंपरा थोड्याफार बदलत जातात. त्यामुळं प्राध्यापक सुरेश मढवी यांच्या संशोधनाचा भविष्यात समाजाला मोठा फायदा होऊ शकेल, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

हे वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news