Maha Shivratri 2024 : ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त सज्ज; ज्येष्ठ नागरिकांसाठी मंदिरात स्वतंत्र रांग | पुढारी

Maha Shivratri 2024 : ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त सज्ज; ज्येष्ठ नागरिकांसाठी मंदिरात स्वतंत्र रांग

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणेकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री कौपिनेश्वर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी सज्ज झाले आहे. शुक्रवारी (दि.८) महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात जय्यत तयारी सुरू असून मंदिर शुक्रवारी पहाटे २.३० पासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे.

श्री कौपिनेश्वर मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी यंदाही स्त्री – पुरूषांसाठी वेगळी – वेगळी दर्शनरांग असणार आहे. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी व अति महत्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र दर्शनरांगेचे नियोजन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दर्शनरांगेतून दर्शन घेत असताना भाविकांनी शिस्तीचे पालन  करावे, असेही आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ठाणे शहरातील प्रसिद्ध मंदिर असलेले श्री कौपिनेश्वर मंदिर इ. स. १७६० च्या सुमारास सर सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी बांधले आहे. या मंदिरातील शिवलिंगाची उंची ४ फूट ३ इंच असून गोलाकार घेर १२ फुट असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव असलेले भव्य शिवलिंग आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला केवळ शहरातून नाही तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. यंदा १ लाख भाविक मंदिरात दर्शनाला येतील, यादृष्टीने मंदिर व्यवस्थापन समितीने नियोजन केले आहे. शुक्रवारी पहाटे २.३० वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन रांग खुली राहणार आहे. सकाळी महापूजा होईल, त्यानंतर लघुरूद होईल. सायंकाळी श्री कौपिनेश्वराची महापूजा आणि आरती होणार आहे, अशी माहिती श्री कौपिनेश्वर मंदिर समितीचे सचिव रवींद्र उतेकर यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलतांना दिली.

हेही वाचा :

Back to top button