Maha Shivratri 2024 : औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी; आज मध्यरात्री होणार महापूजा | पुढारी

Maha Shivratri 2024 : औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी; आज मध्यरात्री होणार महापूजा

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औेंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त (Maha Shivratri 2024) सुमारे दोन लाखापेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज संस्थानने व्यक्त केला आहे. गुरुवारी मध्यरात्री महापुजा होणार असून त्यानंतर पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाणार आहे.

संबंधित बातम्या : 

महाशिवरात्री (Maha Shivratri 2024) निमित्त गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते दिड यावेळेत संस्थानचे पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत महापूजा होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंत अभिषेक करता येतील. त्यानंतर गर्दी लक्षात घेऊन अभिषेक बंद केले जातील. शुक्रवारी (दि.८) रात्री ११ वाजेपपर्यंत मंदिर खुले राहणार आहे. यावर्षी सुमारे दोन लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज असून भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महाशिवरात्री (Maha Shivratri 2024) महोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने आज औंढा नागनाथ येथे भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला आहे. मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलिस मदत केंद्रात भाविकांना आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा व औंढा नागनाथ पोलिसांची गस्त सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button