Ajit Pawar : भाजपसोबत जायला शरद पवारांनीच सांगितले; अजित पवारांचा गौप्यस्फोट | पुढारी

Ajit Pawar : भाजपसोबत जायला शरद पवारांनीच सांगितले; अजित पवारांचा गौप्यस्फोट

चंदन शिरवाळे

कर्जत : मला सत्तेत जायला शरद पवार यांनीच सांगितले होते. मी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. तू भाजपसोबत जा, असे त्यांनी सांगितल्याने आम्ही भाजपसोबत सत्तेत गेलो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केला. शरद पवार यांच्या राजीनामानाट्याचाही पर्दाफाश करीत अजित पवारांनी काकांवर कोणताही आडपडदा न ठेवता थेट हल्ला चढवला. राजीनामा देतो म्हणून सांगितले आणि पुन्हा राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायलाही लावले. आम्हाला सतत गाफील ठेवले गेले, अशी तक्रारही अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, मी 32 वर्षांपासून मंत्री म्हणून काम करीत आहे. त्यामुळे मला कामाचा चांगला अनुभव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्या अध्यक्षतेखाली काम करत आहे, अशी वर्तमानातून सुरुवात करत अजित पवारांनी मग शरद पवारांनी घडवलेल्या राजीनामानाट्यावरील पडदा वर करण्यास सुरुवात केली. (Ajit Pawar)

खरे तर शरद पवारांनीच मला मी राजीनामा देतो, तू अध्यक्ष हो, असे सांगितले. भाजपसोबत जाण्याचा सल्लाही त्यांनीच दिला. त्यानुसारच आम्ही सत्तेत गेलो.

थेट साहेबांकडे गेलो

अजित पवार आता कहानी पुढे नेऊ लागले. म्हणाले, आम्ही सात-आठ दिवस थांबलो. पुन्हा आम्ही एकत्र बसलो. जयंत पाटील, अनिल देशमुख होते. भाजपसोबत सरकारमध्ये गेले पाहिजे. आमदारांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. अनेक प्रश्न आहेत. याचा विचार आम्ही केला आणि मग विचार करून डायरेक्ट साहेबांकडे गेलो आणि त्यांना आमचा निर्णय सांगितला.

ते म्हणाले, ठीक आहे. बघू काय करायचे ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो. वेळ जात होता. आम्ही म्हणालो, वेळ जातोय, निर्णय घ्या. दरम्यान, 1 मे होता. त्यांनी मला बोलावून सांगितले की, सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. निर्णयाला उशीर झाल्याचे कारणही त्यांनी दिले. 1 मे रोजी झेंडावंदन होते आणि 2 तारखेला पुस्तक प्रकाशन होते. असेही ते म्हणाले.

सुप्रिया, जयंत पाटलांच्या उपस्थितीत निर्णय झाला

शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या सर्वांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठकीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय झाला होता. मागाहून तो फिरवला गेला. मग राजीनाम्याचे नाटक करून राजीनामा मागे घेण्याचे आंदोलनही उभे केले गेले. कोर्टबाजीत तुम्ही पडू नका, असे सांगून आम्हाला गाफील ठेवले आणि शरद पवार यांनीच न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. तरीही आम्ही डगमगणार नाही. त्यामुळे आम्ही आता आमच्या वाटेने पुढे जाऊ आणि आम्हीच ही लढाई जिंकू, असा दावा अजित पवार यांनी केला.

आरोप सिद्ध करा

आमच्यावरील केसेसमुळे आणि गैरव्यवहारांच्या आरोपाला घाबरून आम्ही भाजपबरोबर सत्तेत सहभागी झालो, असा आरोप केला जातो. मात्र हे खोटे आहे. राजकारणात काम करताना आरोप होत असतात. पण ते सिद्ध झाले पाहिजेत. तरच त्याला अर्थ आहे. आता मी वारंवार त्याबाबत बोलणार नाही. आता आपल्याला मागे नाही, तर पुढे जायचे आहे. पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन उपस्थितकार्यकर्त्यांना अजित पवारांनी केले. (Ajit Pawar)

मी नेहमीच राज्याचा सर्वांगीण विकास करण्याला प्राधान्य दिले. माझ्या 32 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, कामे केली. काही वेळेस प्राप्त परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घ्यावे लागतात. याचा अर्थ आम्ही आमच्या विचारांशी, विचारधारेशी तडजोड केली, असा अर्थ त्याचा होत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल

नरेंद मोदी यांना तिसर्‍यादा पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती करण्यात आली. मात्र त्या नेत्यांमध्येसुद्धा एकमत नाही. ते सर्व गोंधळलेल्या स्थितीत आहेत. विचार करायला लावणारी बाब म्हणजे आहे जे इंडिया आघाडीत जाऊन आता भाजपला विरोध दर्शवितात, यातील बहुतेक पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी यापूर्वी कधी ना कधी केंद्रात, राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली होती, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लावले

शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, त्यांनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला. मग अचानक स्वतःच काही कार्यकर्त्यांना पुढे करून राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायला का सांगितले? आम्हाला भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यास सांगून नंतर काही दिवसांत आपली भूमिका बदलली आणि आम्हालाच जनतेसमोर खोटे का ठरवले, असा उद्वेगही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

पुण्याच्या उद्योगपतीमार्फत मला का बोलावले?

कर्जतच्या दोनदिवसीय विचार मंथन शिबिराचा समारोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन प्रश्न विचारून शरद पवार यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला, ते प्रश्न असे : पुण्यातील उद्योगपतीमार्फत मला का बोलावून घेतले? विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करून पक्षाचा पदाधिकारी का बनवले नाही? भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याबाबत आमचा निर्णय आवडला नव्हता तर पुन्हा भेटीसाठी

बोलवले कशाला?

सुप्रिया म्हणाली; मला 7 ते 10 दिवस द्या! अजित पवार सांगू लागले, नीट ऐका. मी स्वत:, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे आम्ही दहा-बाराजण देवगिरीला बसलो होतो. अनिल देशमुखही येणार होते. मात्र त्यांना मंत्रिपद मिळत नसल्याने ते आले नाहीत. भाजपसोबत जायचे पण कसे जायचे याचा विचार सुरू होता. डायरेक्ट साहेबांना सांगितले तर त्यांना काय वाटेल हा प्रश्न होता. म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना बोलावून घेतले. तिला म्हणालो, सर्व जीवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो. तरच संघटना पुढे जाते. त्या म्हणाल्या, मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना कन्व्हिन्स करते. काय करायचे ते माझ्यावर सोपवा. (Ajit Pawar)

जरांगे-पाटलांना सल्ला

ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मांडताना च सरसकट कुणबी दाखल्यांना विरोध करत अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून जातीजातींत भांडणे उभी राहिली हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. आता तेढ का निर्माण केली जात आहे? यातून दंगली घडल्या तर जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा :

Back to top button