काका-पुतण्याची लढाई निर्णायक वळणावर

काका-पुतण्याची लढाई निर्णायक वळणावर

ठाणे : शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्याचे चालले काय, ते कधी एकत्र येतात, तर कधी एकमेकांसमोर उभे राहतात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके काय होणार याबद्दलचे अनेक तर्क-वितर्क आणि शंका-कुशंका नेहमीच ऐकायला मिळायच्या. पण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जत येथे झालेल्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिरातील निर्धार आणि व्यक्त केलेला आक्रमकपणा पाहिल्यानंतर काका-पुतण्याची लढाई आता निर्णायक वळणावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्जत येथील चिंतन शिबिरात छगन भुजबळ वगळता सर्व मंत्री, नेत्यांची मोठी उपस्थिती होती. शरद पवार गटावर आक्रमण हाच या शिबिराचा मुख्य उद्देश राहिला. आम्हाला भाजपसोबत शरद पवारांनीच पाठवले आणि आता अजित पवारांना खलनायक केले जाते आहे, हा मुद्दा धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी लावून धरला. एका बाजूला शरद पवार, त्यांच्या भूमिका यावर आक्रमक टीका आणि दुसर्‍या बाजूला लोकसभेची तयारी असा या शिबिराच्या कार्यक्रमांचा सिलसिला होता.

सुनील तटकरे खासदार असलेले रायगड, सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामती, सातारा आणि शिरूर या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या चारही जागा आता अजित पवारांची राष्ट्रवादी लढवणार आहे. या शिवाय दक्षिण मुंबई आणि म्हाडा या मतदारसंघावरही अजित पवार गटाने दावा केलेला आहे. या मेळाव्यात आम्ही भाजपच्या महायुतीबरोबरच राहणार, असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून लढवल्या जाणार्‍या लोकसभेच्या काही जागांच्या विरोधात अजित पवार गट उतरणार आहे, असेही स्वतः अजित पवार यांनीच स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आता अटळ मानली जात आहे. दोन्ही गटांकडून लढली जात असलेली निवडणूक आयोगाकडील लढाई आणि न्यायालयीन लढाई याबाबतही अजित पवार यांनी भूमिका मांडली. आम्हाला गाफील ठेवण्यात आले, तरीही लढाई आम्हीच जिंकणार, असा अजित पवार गटाचा दावा आहे. ओठात एक आणि पोटात एक ही भूमिका आम्ही कधीच मान्य करीत नाही आणि करणार नाही, असे सांगत अजित पवारांनी काकांच्या विचारशैलीवरच हल्ला केला. एका बाजूला दोन शिवसेनेमधील लढाई आणि दुसर्‍या बाजूला दोन राष्ट्रवादी काँग्रेसमधील लढाई महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक निर्णायक लढाई म्हणून पाहिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news