

Dombivali Rape Case : डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार खटल्यात २२ आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवत त्या व्हिडिओद्वारे ३३ जणांनी विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर विविध पक्षातील नेते , विविध संघटना यांनी आरोपींना शिक्षा व्हावी यसाठी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट दिली होती. इतकेच नव्हे तर पिडीतेने आपल्या जबाबात अनेक गोष्टींचा खुलासा केला असल्याचे समजत आहे.
ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला असून त्यानुसार ३३ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्यात विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी १५ दिवसात चार्जशीट दाखल करावी असे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र सोमवारी २२ आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी आणखी दोन दिवस चौकशी साठी आरोपींना पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायाधीशांकडे केली होती.
परंतु बचाव पक्षातर्फे अधिक तपास करण्यासाठी तसेच ज्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तपास करण्यासाठी आरोपींची शाररिक हजेरी गरजेची नसल्याचे सांगत आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी न्यायाधीशांकडे केली. त्यानुसार न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी आरोपीच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात न्यायालयीन परिसरात गर्दी केली होती. आरोपी तुरुंगात जाणार असल्याने कपडे देण्यासाठी पालकांची धडपड सुरू होती.