डोंबिवली : घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन संशयीत आरोपींना पकडण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे. सारुद्दिन ताजुद्दीन शेख (वय ३२, रा. मुंब्रा) व मोहम्मद जिलानी ईसा शहा (वय ४० रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २१ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व सतर्क पेट्रोलिंगचे काम सुरू केले आहे. २८ फेब्रुवारीला रात्री गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप यांना निसर्ग ते मानपाडा सर्कल या निर्जन रस्त्यावर दोघेजण संशयितरित्या फिरताना निदर्शनास आले. पोलीस येत असल्याचे पाहून त्यांनी मोटार सायकल सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यांच्याकडून २१ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित दोघांवर विविध पोलीस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल आहेत. तसेच मुंबई येथील पायदुनी, सायन, ताडदेव, व्ही.पी.रोड, नागपाडा, आगरीपाडा पोलीस ठाण्यात सुमारे २५ घरपोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा :